पिरंगुट (ता. मुळशी) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अनंतराव पवार महाविद्यालय, पिरंगुट आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवत्तासुधार योजनेअंतर्गत “महिला सबलीकरण व सक्षमीकरण” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन उत्साहात करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व विद्यापीठ गीताने झाली. पाहुण्यांचा परिचय प्रा. भरत कानगुडे यांनी केला. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार रोप व पुस्तक देऊन करण्यात आला. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी अंजली शर्मा हिने सुमधुर स्वागतगीत सादर करून वातावरण प्रसन्न केले. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो यांनी केले. त्यांनी मुळशीसारख्या दुर्गम तालुक्यातील कातकरी व इतर वंचित घटकांतील विद्यार्थिनींसाठी शिक्षण व सर्वांगीण विकासाच्या संधी निर्माण करून त्या सक्षम करण्याचे कार्य महाविद्यालय कसे करत आहे, याचे सविस्तर विवेचन केले.
पहिल्या सत्रात प्रमुख वक्त्या ॲड. शैलजा मोळक (अध्यक्ष, शिवस्फूर्ती प्रतिष्ठान) यांनी “महिला विषयक कायदे” या विषयावर भाष्य केले. त्यांनी ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले, डॉ. रखमाबाई राऊत अशा आदर्श स्त्रियांच्या कार्याचा उल्लेख करून सांगितले की, महिलांनी केवळ स्वावलंबी न होता, सक्षम होणे अत्यावश्यक आहे. “कायदे आहेत, पण न्याय आहे का?” या प्रश्नाद्वारे त्यांनी उपस्थितांना अंतर्मुख केले. सक्षमीकरणासाठी फक्त ज्ञानार्जन पुरेसे नाही, तर त्याचा योग्य उपयोगही करता यायला हवा, असे मत त्यांनी मांडले.बायफ रिसर्च फाउंडेशनच्या व्यवस्थापक सुजाता कानगुडे यांनी "महिलांची निर्णयक्षमता आणि आत्मभान" या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, प्रत्येक स्त्रीने स्वतःला ओळखणे आणि स्वतःवर प्रेम करणे हीच सबलीकरणाची पहिली पायरी आहे. “इतरांशी तुलना न करता, स्वतःशी तुलना करा – तेव्हाच खरे सक्षमीकरण घडते” हा त्यांचा मंत्र होता.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात इंडीया फायनान्शियल सर्व्हिसेस, मोशी पुणे येथील हीना मुलाणी यांनी “वित्तीय सक्षमीकरण व योजना” या विषयावर मार्गदर्शन केले. स्वतःच्या पायावर उभे राहणे म्हणजेच खरे सक्षमीकरण असून, आर्थिक स्रोत निर्माण करण्यासाठी विविध शासकीय योजनांची माहिती त्यांनी दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खारवडे येथील म्हसोबा देवस्थानच्या अध्यक्षा सौ. माधुरीताई भेलके होत्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी म्हसोबा देवस्थानच्या माध्यमातून राबवलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. पूर्वी खारवडे येथे प्राण्यांचे बळी दिले जात असत, ती अंधश्रद्धा मोडून काढत ही प्रथा बंद करण्याचा अनुभव त्यांनी सांगितला. गाडगेबाबांचा अभ्यास करून श्रद्धेला वैज्ञानिक दृष्टिकोन जोडण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.“वैचारिक स्वातंत्र्य मिळाले तरच स्त्रिया खऱ्या अर्थाने सबल व सक्षम होतील,” असे ते स्पष्टपणे सांगत त्यांनी विद्यार्थिनींना गुण, विचार व निर्णयक्षमतेवर आधारित यश मिळवण्याचा सल्ला दिला. “पार्वतीचे वाहन वाघ आहे, आपणही कोणत्या आधारावर उभे राहायचे, हे स्वतः ठरवले पाहिजे,” हे प्रतिकात्मक विधान त्यांनी प्रभावीपणे मांडले.
या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन डॉ. विजय बालघरे व डॉ. नम्रता आल्हाट यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक डॉ. स्मिता लोकरे, डॉ. अभय पाटील, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. दत्ता भांगे, प्रा. सोनाबा धोत्रे, प्रा. दीप सातव, प्रा. सिद्धार्थ नवतुरे, विशाल मोकाटे, मंगेश गोळे, आम्रपाली डोळस, हेमंत वायकर, विजय साखरे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष परिश्रम घेतले.