मुंबई : एकनाथ शिंदेंनी सभागृहात नाव न घेता उद्धव ठाकरेंवर मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरुन टीका केली. त्यानंतर आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदेंवर गद्दार, नमक हराम, अहसान फरामोश म्हणत जोरदार टीका केली. त्यांच्या या टीकेची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरु आहे.
विधासभेत नेमकं काय घडलं?
मतदानाच्या आधी म्हणायचं मराठी मराठी आणि निवडून आल्यावर म्हणायचे कोण रे तू? असे म्हणत नाव न घेता एकनाथ शिंदेंनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडीच्या काळात सर्व ठप्प होतं, मराठी माणसाला ठेंगा दाखवण्याचे काम केले. कोविडमध्ये खिचडी चोरणारे, डेड बॉडी बॅग चोरणारे आत्ता भ्रष्टाचाराचा आरोप करतात. आम्ही तर रस्ते धुवायला गेलो, तुमच्या लोकांनी तर तिजोऱ्या धुतल्या असे म्हणत एकनाथ शिंदेंनी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरुन ठाकरेंना लक्ष्य केलं.
शिंदे या टीकेवर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे. काही संस्कार झाले आहेत की नाही? असा सवालदेखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
उद्धव ठाकरे सरकारने सर्व दिलं, यांना कोण ओळखत तरी होतं का? या आधीच्या सरकारने आपण माहिती घ्या, मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खातं कोणाला कधी दिलयं का?. पण, याना दिलं यांनी काय केलं तर गद्दारी. यांना जराही लाज वाटत नाही, ज्या व्यक्तीने एवढं सगळं दिलं त्यांच्यावर आरोप करता. काही संस्कार झाले आहेत की नाही, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी नाव न घेत थेट एकनाथ शिंदेंवर जोरदार प्रहार केला. डोळ्यात डोळे घालून आरोप करा म्हटलं. मात्र, तिही त्यांच्यात हिंमत नाही, खाली बघूनच बोलतात, असा टोलाही आदित्य यांनी लगावला.
विधानसभेत शिंदे सगळंच बोलून दाखवले
मुंबईकर आमच्यासाठी फर्स्ट आहेत आणि इतरांसाठी कंत्राटदार फर्स्ट आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच चहल यांना बोलावले आणि खड्यांच्या संदर्भात सांगतील आणि त्यानंतर दोन फेजमध्ये सर्व रस्ते करण्याचे आदेश दिले. पहिला फेज पूर्ण झाला आहे, आपण काँक्रीटीकरण करत आहोत, त्यामुळे मुंबई खड्डेमुक्त होईल. मुंबई आणि एमएमआर रिजन १.५ ट्रिलियन डॉलरची क्षमता आहे. आमच्यावर मुंबई तोडण्याचा आरोप होतोय पण आम्ही जोडणारे आहोत, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले.
मराठी माणसासाठी काय केलं असं म्हणत अनेकजण गळे काढतात, मात्र तो बाहेर का फेकला गेला याचं आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. कोणाच्या काळात हे बाहेर गेले, पत्राचाळीमध्ये कोणी माया गोळा केली? संक्रमण शिबिरात खुराड्यासारख ठेवण्यात आल ते मराठी माणस नाही का? असा सवाल एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला.