मुंबई : ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत’ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर, 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर, 2025 या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ अभियानाअंतर्गत मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते आधार संच वितरण व नागरिकांना घरपोच सेवा देण्याकरिता ‘फिरते सेतू केंद्र’ (MOBILE SETU) चा शुभारंभ करण्यात आला.
पालकमंत्री ॲड. शेलार म्हणाले, जगामध्ये भारताची ओळख निर्माण करणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून त्यांच्या ‘प्रधानसेवक’ या भूमिकेतून प्रेरणा घेऊन लोकांना सेवा देण्याच्या या मोहिमेंतर्गत सेवा प्रकल्प म्हणून आधार संच वितरित करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. आदिवासी, कोळीवाड्यातील कोळी बांधव, झोपडपट्टीधारक, सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचून त्यांना घरापर्यंत सेवा देण्याकरिता ‘फिरते सेतू केंद्र’ हा उपक्रम देखील अंत्यत स्तुत्य आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अत्याधुनिक सेतू सुविधा केंद्र कार्यान्वित होत असल्याबाबत अभिनंदन करुन ही सेवा या पंधरवड्यामध्ये उपलब्ध करुन देण्याचे येईल. कार्यक्रमात 36 आधार संच वितरित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार म्हणाले, या अभियानांतर्गत बोरीवली, कुर्ला व अंधेरी या तहसील कार्यालयातील सुविधा केंद्र अद्ययावत व आधुनिक करण्यात येत आहेत. तसेच जिल्ह्यात नव्याने वार्डनिहाय 374 आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्यात येत आहेत. नागरिकांना तत्काळ सेवा मिळण्याकरिता प्रथमच जिल्ह्यात ‘फिरते सेतू केंद्र’ व आधार केंद्र बळकट करण्याकरिता आधार नोंदी संच वितरित करण्यात येत आहेत. तसेच नागरिकांना तात्काळ सेवेचा लाभ उपलब्ध करुन देण्याकरिता सर्व दाखले ‘WhatsApp’ वर उपलब्ध करुन देण्यात येत आहे.