सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये राडा, अनिल परबांचा रुद्रावतार, शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी
 राज्य

फरिदाबादमध्ये स्फोटके सापडल्याने डॉ. उमर घाबरला; घाईघाईत आखला दिल्लीतील स्फोटाचा कट! तपासात धक्कादायक खुलासे

डिजिटल पुणे    11-11-2025 10:52:27

दिल्ली : फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलचा उलगडा होत असतानाच देशाला हादरवणारी माहिती समोर आली आहे. दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनबाहेर झालेला स्फोट हा आत्मघातकी हल्ला असल्याची शक्यता तपास यंत्रणांनी वर्तवली आहे. आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी आहेत.फरिदाबादमध्ये मोठ्या प्रमाणावर स्फोटके सापडल्यानंतर दहशतवादी डॉ. उमर मोहम्मद भीतीने हादरला होता. त्याच क्षणी त्याने दिल्लीत आत्मघातकी हल्ल्याची योजना आखल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दिल्ली ब्लास्ट, कारमधील व्यक्ती दहशतवादी डॉ. उमर असल्याचा संशय

लाल किल्ला स्फोटापूर्वीचे काही फोटो-व्हिडिओ पोलिसांच्या हातात आले आहेत. संशयित आय-20 कार दुपारी 3.19 वाजता सुनेहरी मशिदीजवळील पार्किंगमध्ये गेली आणि सुमारे तीन तास तिथेच उभी राहिली. गाडी संध्याकाळी 6.48 वाजता पार्किंगमधून बाहेर पडली आणि काही मिनिटांनीच स्फोट झाला. कारमधील व्यक्ती दहशतवादी डॉ. उमर असल्याचा संशय आहे. कारचा व्हिडिओही समोर आला आहे. दरम्यान, आतापर्यंत या हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू, 24 जण जखमी झाले आहेत.

 स्फोटावेळी उमर कारमध्येच होता

सीसीटीव्ही फुटेजनुसार, उमर मोहम्मद स्फोट झालेल्या हुंडई आय-२० कारमध्येच होता. त्याच्यासोबत इतर दोन दहशतवादी असल्याचा संशय आहे. एजन्सींनी या कारचा संपूर्ण प्रवास मॅप केला असून ती शेवटची बदरपूर सीमेजवळ दिसली, त्यानंतर ती लाल किल्ल्याच्या दिशेने गेली होती.फरिदाबाद मॉड्यूलमधील दहशतवादी डॉ. उमर मोहम्मद फरार होता आणि एजन्सी त्याचा शोध घेत होत्या. एका हिंदी वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, स्फोटावेळी दहशतवादी उमर मोहम्मद कारमध्ये होता. त्याने इतर दोन सहकारी दहशतवाद्यांसह हल्ल्याची योजना आखली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलमध्ये जलद अटक होऊ लागली, तेव्हा त्याला अटकेची भीती वाटू लागली आणि घाबरून त्याने दहशतवादी हल्ल्याची योजना आखली. त्याने त्याच्या साथीदारांसह कारमध्ये डिटोनेटर ठेवले आणि स्फोट घडवून आणला. जम्मू, काश्मीर पोलिस आणि फरिदाबाद पोलिस एका डॉक्टरचा शोध घेत आहेत.

 डीएनए चाचणीद्वारे ओळख निश्चितीचा प्रयत्न

स्फोटस्थळावरून मिळालेल्या जळालेल्या मृतदेहाचा डीएनए तपास सुरू असून, तो डॉ. उमर मोहम्मदचाच आहे का याचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळावरून अमोनियम नायट्रेटचे अवशेष मिळाले आहेत.

 कार मालक आणि व्यवहार साखळी उलगडली

स्फोटात वापरलेली आय-२० कार सुरुवातीला मोहम्मद सलमान या व्यक्तीच्या नावावर होती. सलमानने ती नदीमला विकली, त्यानंतर ती फरिदाबादमधील रॉयल कार झोन डीलरकडे गेली. शेवटी ती कार उमर मोहम्मद पर्यंत पोहोचली.पुलवामामधील तारिक आणि आमिर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू आहे.लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात वापरलेली आय-२० कार मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीची होती. त्याने ती नदीमला विकली. नदीमने ती कार फरीदाबाद येथील रॉयल कार झोन या कार डीलरला विकली. त्यानंतर तारिकने ती खरेदी केली. त्यानंतर, ती उमरने घेतली होती. ही कार हरियाणातील गुरुग्राम उत्तर आरटीओमध्ये नोंदणीकृत होती. तिचा क्रमांक एचआर २६ ७६२४ होता आणि ती मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत होती.

काल रात्री पुलवामातील सांबुरा येथे पोलिसांनी तारिकला ताब्यात घेतले, कारचा आरसी तारिकच्या नावावर नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तारिकने २०१५ मध्ये उमरला कार दिली होती तोपर्यंत ही गाडी तारिकच्या नावावर होती. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे. या व्यवहारात आमिर नावाचा एक माणूस सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिस तारिक आणि आमिरची चौकशी करत आहेत.

 एफआयआर आणि कठोर कलमे लागू

दिल्ली पोलिसांनी या घटनेवरून UAPA कायद्याखाली कलम 16 आणि 18, तसेच स्फोटक पदार्थ कायद्याचे कलम 3 आणि 4 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच खून आणि खुनाचा प्रयत्न या कलमांचाही समावेश आहे.

 फरिदाबाद मॉड्यूलचा थेट संबंध

विशेष शाखेच्या तपासात लाल किल्ला स्फोटाचा संबंध फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मॉड्यूलचे संबंध जैश-ए-मोहम्मद (JeM) आणि अन्सार गजवत-उल-हिंद (AGuH) या बंदी घातलेल्या संघटनांशी असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी डॉ. मुझम्मिल अहमद गनई, डॉ. आदिल अहमद राथेर, आणि डॉ. शाहीन शाहिद या तिघांना अटक केली आहे. आतापर्यंत सात जणांना ताब्यात घेण्यात आले असून २,९०० किलो स्फोटके आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.फरिदाबादपासून दिल्लीपर्यंत पसरलेला हा दहशतवादी कट देशातील सुरक्षायंत्रणांसाठी मोठे आव्हान ठरला आहे. पोलिस आणि गुप्तचर यंत्रणा या संपूर्ण प्रकरणाचा धागेदोरा जोडण्याच्या प्रयत्नात आहेत.


 Give Feedback



 जाहिराती