उरण : सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (CITU ) महाराष्ट्र राज्य १७ वे अधिवेशन मुंबई मध्ये पार पडले. उदघाटन अखिल भारतीय सरचिटणीस व माजी खासदार कॉ. तपण सेन यांनी केले. त्यांनी सांगितले केंद्र सरकारने अमलात आणलेले चार नवीन कामगार कायदे कामगारांना गुलाम करतील.या कायद्याना शेवटपर्यंत विरोध करणार कारण त्या कायद्याने फक्त मालकांना लाभ होणार आहे. सिटू अध्यक्ष कॉ. डॉ. हेमलता यांनी मार्गदर्शन करताना सांगितले भविष्यात कामगारांच्या हितासाठी सर्व कामगारांना एकत्र आणणार आहोत.संघटित व असंघटित कामगारांच्या संघटना मजबूत करून संघर्ष केल्या शिवाय कामगारांचे अस्तित्व टिकणार नाही.
या सरकारने कायमस्वरूपी कामगार नष्ट करण्याचा घाट घातला असून कायम कामासाठी सर्वत्र कंत्राटी कामगार भरले जात आहेत. यासर्व कामगारांना जगण्यासाठी किमान वेतनात भरघोस वाढ करण्यात यावी हि मागणी त्यांनी केली. या अधिवेशनात कॉ. डॉ. डी एल कराड यांची अध्यक्ष, कॉ. एम एच शेख यांची सरचिटणीस तर कॉ. के आर रघु यांची खजिनदार म्हणून निवड झाली. रायगड जिल्यातील जेष्ठ कामगार नेते कॉ. भूषण पाटील यांची राज्य सचिव पदावर निवड झाली. तसेच विशाखापट्टनम येथे ३१ डिसेम्बर ते ४ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या अखिल भारतीय अधिवेशनासाठी त्यांची निवड झाली आहे.