नागपूर : राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ व डॉ . पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाला आज भेट देऊन पाहणी केली.सेमिनरी हिल्स येथील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाला भेट दिली. तसेच विद्यापीठातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली. विद्यापीठातर्फे सुरू असलेल्या संशोधन तसेच अत्याधुनिक प्रयोगशाळा आदींची पाहणी केली. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन पाटील तसेच विभागप्रमुख उपस्थित होते. ‘माफसू’ अंतर्गत येत असलेल्या पशु पैदास प्रक्षेत्राला त्यांनी भेट दिली. यावेळी गोवंश संवर्धन विशेषतः देशी गायींच्या संवर्धनाच्या सूचना त्यांनी केल्या.
महाराज बागेजवळील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाला भेट दिली व चर्चा केली. कृषी महाविद्यालयातर्फे कृषी विषयक राबविण्यात येत असलेल्या संशोधन प्रकल्पाची तसेच संशोधित केलेले संशोधन शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचवता येईल याची माहिती घेतली. नैसर्गिक शेतीला प्राधान्य देत अधिक उत्पादन देणाऱ्या संशोधित वाणांचा अवलंब करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी राज्यपालांनी कृषी विद्यापीठांच्या प्राध्यापकांसोबत संवाद साधला. कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश कडू यांनी विविध विभागांची माहिती दिली.