नागपूर : जलसंधारण विभागांतर्गत राज्यात विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या प्रकल्पांमधील काही प्रकल्पांबाबत तक्रार प्राप्त झाल्यानुसार या प्रकरणाशी संबंधित विभागातील अधिकारी सुनील कुशिरे यांची वाल्मी या संस्थेत बदली करण्यात आली असून २००८ ते २०१४ या कालावधीतील प्रकल्पांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुरू असल्याची माहिती जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विधानपरिषदेत दिली. यासंदर्भात विधानपरिषद सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्यात येईल आणि त्याचा अहवाल दोन महिन्यात सादर केला जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.सदस्य ॲड. अनिल परब यांनी या संदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सतेज पाटील, शशिकांत शिंदे आदींनी सहभाग घेतला.
याबाबत अधिक माहिती देताना जलसंधारण मंत्री संजय राठोड म्हणाले, मे. वॉटरफ्रंन्ट कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीने निविदा भरताना वाहनाची खोटी शपथपत्रे व इतर बनावट कागदपत्रे, आरसी बुक दाखल केलेली होती. विभागामार्फत रत्नागिरी शहर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली होती. सद्यस्थितीत पोलीस तपासाअंती कोर्टात चार्जशिट दाखल करण्यात आले आहे. या कंपनीच्या २००८ ते २०१४ या कालावधीतील राज्यातील प्रकल्पांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सुरु आहे. या कंपनीला मंजूर करण्यात आलेल्या मौजे सारंगवाडी, ता. चिखली, जि. बुलढाणा संग्राहक तलाव व पुरसंरक्षक योजनांच्या प्रकल्पाची कार्यकारी अभियंता, गुणनियंत्रण विभाग, अकोला यांच्यामार्फत चौकशी करण्यात आली असून बहुतांश घटकांची कामे सर्वसाधारणपणे योग्य प्रकारे करण्यात आल्याचे दिसून आले असल्याची माहिती त्यांनी दिली.