व्यवस्थापन ताणतणावाचे
प्रस्तावनाः
स्त्री ही केवेळ एक व्यक्ती नाही, तर ती एक सृजनशील शक्ती आहे. तिच्या अस्तित्वात सृजनाची झुळूक आहे,कुटुंबाच्या उबदार घरट्याला आकार देण्याची क्षमता आहे आणि समाजाच्या प्रगतीला गती देणारी ऊर्जा आहे. मात्र, हीच स्त्री विविध प्रकारच्या ताणतणावांना तोंड देत असते. कौटुंबिक जबाबदाऱ्या सामाजिक अपेक्षा, आर्थिक दबाव आणि शैक्षणिक आव्हाने या साऱ्यांचा भार तिच्या कोमल पण समर्थ खांद्यावर असतो. परंतु तिच्या दुर्दम्य इच्छासक्तीने आणि योग्य व्यवस्थापन कौशल्याने ती या तणावांना सामोरी जाऊन यशस्वीपणे जीवनाचा डोलारा सांभाळते.
"स्त्री म्हणजे वात्सल्याची गंगा, सहनशीलतेचा सिंधू,
संकटांच्या वादळातही ताठ मानेने
उभी राहणारी ती विद्युतकांती!"
स्त्रियांना भासणाऱ्या ताणतणावांचे विविध कंगोरे
1. कौटुंबिक ताणतणाव - जबाबदाऱ्यांचे मळभ-
"तिच्या मायेच्या कुपीत सांडले प्रेमाचं गोड गाणं,
पण स्वतःसाठीच न लाभलं सुखाचं एक पान!"
कुटुंब म्हणजे मायेचा दरवळ, प्रेमाचा गाभा आणि आधाराचा कणा. मात्र, याच कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांचा सर्वांत मोठा भार प्रामुख्याने स्त्रीच्या खांद्यावर पडतो. तिने कितीही आत्मनिर्भरतेकाडे वाटचाल केली, तरीही तिच्यावर पारंपरिक कुटुंबव्यवस्थेच्या अपेक्षांचे आणि जबाबदाऱ्यांचे ओझे लादले जाते. या जबाबदाऱ्यांमुळे तिला मानसिक, शारीरिक आणि भावनिक तणावाला सामोरे जावे लागते.
२. मातृत्व आणि पालनपोषणाचा ताणः
मुलांच्या संगोपनाची जबाबदारी मुख्यतः आईवर येतेचे शिक्षण, आरोग्य संस्कारांची काळजी घेण्याचा भार स्त्रीच्या खांद्यावर असतो
मुलांच्या वाढीतील जबाबदाऱ्या - त्यांचे शिक्षण, आरोग्य, स्वभाव, आणि भविष्य घडवण्याची संपूर्ण जबाबदारी आईवर येते.
आई म्हणून कायम सजग असणे समाजाने उरतलेल्या 'आदर्श आई' च्या प्रतिमेमध्ये बसण्यासाठी ती झटत राहते.
व्यक्तिगत वेळेचा अभाव - मुलांची काळजी घेताना स्वतःसाठी वेळ काढणे अवघड होते, परिणामी ती मानसिकदृष्टया थकते.
"मायेच्या सावलीत वाढत गेले फुलांचे रोप,
पण मातृत्वाच्या मुळांना मिळे का विश्रांतीचा श्वास?"
पती-पत्नी नात्यातील समतोल साधण्याचा प्रयत्नः- वैवाहिक नातेसंबंध सुखकर आणि समतोल ठेवणे ही स्त्रीसाठी आणखी एक मोठी जबाबदारी असते. अनेकदा तिला आपल्या इच्छांना बाजूला ठेवून संसारासाठी समायोजन करावे लागते.
नोकरी आणि संसार यातील समतोल - आजच्या काळात स्त्रिया नोकरी करत असल्या तरी त्यांच्यावर घरकामाची जबाबदारी तितकीच मोठी असते.
भावनिक आणि मानसिक तणाव - सहजीवनात समजूतदारपणा असावा लागतो, पण अनेकदा तिला आपल्या भावना आणि समस्या दडवाव्या लागतात.
घरातील वृद्ध सदस्यांची जबाबदारी: भारतीय समाजात वृद्ध आई-वडील आणि सासू-सासऱ्यांची काळजी घेण्याची मुख्य जबाबदारी स्त्रीवर येते.
शारीरिक आणि मानसिक ताण - वृद्धांच्या आरोग्याच्या समस्या, त्यांच्यासाठी वेळ देण्याची गरज आणि त्यांच्याशी जुळवून घेण्याचा ताणामुळे महिलांना मोठा
स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष - इतरांची काळजी घेताना स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होते.
"कुणासाठी जगते, कुणासाठी हसते,
स्वतःच्या वेदना हृदयातच दडते!"
स्त्रियांनी या ताणतणावांवर मात करण्यासाठी काय करावे?
१. कुटुंबासोबत संवाद साधा-
आपल्या भावना व्यक्त करा आणि जबाबदाऱ्या वाटून घ्या.
पती आणि कुटुंबीयांनी समजून घेतले, तर तणाव नक्कीच कमी होऊ शकतो.
२. मानसिक आरोग्याची काळजी घ्या-
स्वतःसाठी वेळ द्या - योगा, ध्यानधारणा, संगीत, वाचन याचा उपयोग करा.
सतत तणाव घेण्यापेक्षा कधी कधी स्वतःसाठीही मोकळेपणाने जगा.
३. जबाबदाऱ्या वाटून घ्या-
घरकाम आणि मुलांच्या संगोपनाची जबाबदारी फक्त स्त्रीचीच नसते, तर ती संपूर्ण कुटुंबाची असते.
पती, मुले आणि घरातील इतर सदस्य यांनी जबाबदारी वाटून घेतल्यास स्त्रीवरील ओझे हलके होऊ शकते.
४. अर्थसाक्षरता आणि स्वावलंबन-
आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी बचत आणि गुंतवणूक करण्यास प्रारंभ करा.
स्वतःच्या करिअरवर लक्ष द्या आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवा.
कुटुंब हे प्रेमाचे आणि विश्वासाचे स्थान असावे, तणावाचे नव्हे. स्त्रियांनी आपल्या जबाबदाऱ्यांबरोबर स्वतःलाही महत्त्व द्यायला शिकले पाहिजे. "घर सांभाळणे" हा केवळ तिचा एकट्याचा भाग नाही, तर कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून तो सांभाळला पाहिजे.
"ती फुलवते संसार, ती झिजते प्रेमासाठी
पण तिच्या वैदनांचे गूज कोण ऐकते?"
समाजाने आणि कुटुंबाने जर महिलांची भावनिक, मानसिक आणि शारीरिक बाजू समजून घेतली, तर कौटुबिक तणाव कमी होईल आणि घर खरेच आनंदाचे केंद्र बिंदू बनू शकेल
२. सामाजिक ताणतणाव -
समाजाच्या रूढी आणि परंपरांच्या चक्रव्यूहात स्त्री अनेकदा अडकते.तिने कितीही मोठी झेप घ्यायची ठरवली, तरी पारंपरिक विचारसरणी तिचे पंख छाटण्याचा प्रयत्न करत राहते.
समाजाकडून तिच्यावर ठराविक मर्यादा लादल्या जातात, जसे की, तिच्या कपडयांबाबत नियम, करिअर निवडीवर नियंत्रण, आणि सार्वजनिक आयुष्यातील सहभागावर बंधने.
स्त्री-पुरुष समानता अजूनही काही क्षेत्रांमध्ये केवळ कल्पनेतच आहे.
"ती झेपावते स्वप्नांच्या नभामध्ये, पण बंधनांची बेडी अद्यापही साखळदंड!"
समाज ही एक सजीव रचना आहे, जी काळानुसार बदलत जाते. मात्र, काही परंपरा, प्रथांनी अजूनही स्त्रियांना अडवून ठेवले आहे. जरी आधुनिकता आणि स्त्री-पुरुष समानतेच्या चर्चा होत असल्या तरी, समाजातील अनेक रूढी -परंपरा आजही महिलांसाठी जोखड बनून राहिल्या आहेत.
* स्त्रियांवरील समाजाची बंधने आणि अपेक्षा
कपड्यांवरील निर्बंध - स्त्रियांनी कसे कपडे घालावेत यावर समाजात अजूनही ठराविक नियम लादले जातात.आधुनिक विचारसरणीचा स्वीकार होत असला तरी, स्त्रियांवर आजही त्यांच्या पोशाखावरून न्याय केला जातो.
स्वतंत्र निर्णय घेण्यास अडथळे - शिक्षण, नोकरी, व्यवसाय किंवा विवाह यासंदर्भात स्त्रियांनी स्वातंत्र्याने निर्णय घ्यावा, असे अजूनही अनेकांना वाटत नाही.
"तिच्या स्वप्नांना बांधता ओझी परंपरेची?
ती आकाशात झेपावेल, नको बांधू बेडी जगाचे!"
लग्न आणि कौटुंबिक जबाबदाव्यांचा ताण
सून म्हणून अपेक्षांचा बोजा - लग्नानंतर स्त्रीवर "संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी" सांभाळण्याची अनावश्यक टाकली जाते.
"मुलगी म्हणजे केवळ कर्तव्याचा कडेलोट नव्हे,
तिला तिचं विश्व शोधू द्या, तिच्या इच्छांना वाट देऊ द्या!"
"समाज काय म्हणेल?' मा मानसिकतेचा अडथळा - अनेक शिया भीतीने आपल्या इच्छांना दडवून टाकतात
कामकाजी स्त्रियांना दुय्यम स्थान - घर आणि ऑफिस या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडताना महिलांना सतत समाजाच्या टीकेला सामोरे जावे लागते.
महिलांविरुद्ध असलेल्या सामाजिक असमानता आणि हिंसा
घरगुती हिंसा, छेडछाड, लिंगभेद आणि सुरक्षिततेचा प्रश्न हा आजही महिलांसाठी गंभीर आहे.
स्त्रियांना स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचे असल्यास समाजाच्या मानसिकतेत बदल करावा लागेल.
"ती गुलाम नाही, ती कोणाची सावली नाही,
ती स्वतंत्र आहे, तिच्या तेजाने उभी आहे !"
स्त्रियांनी या ताणतणावांवर मात करण्यासाठी काय करावे?
महिलांनी स्वतःच्या निर्णयक्षमतेवर विश्वास ठेवावा आणि समाजाच्या अपेक्षांना शहाणपणाने सामोरे जावे.
शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबन यामुळे महिलांना अधिक अधिकार आणि आत्मविश्वास मिळू शकतो.
नवीन पिढीने महिलांसाठी अधिक समंजस आणि समानतेची विचारसरणी स्वीकारली पाहिजे.
परंपरांचा आदर असावा, पण त्या जर स्त्रियांना मागे खेचणाऱ्या असतील, तर त्यांचा बदल आवश्यक आहे. स्त्रियांना समाजाच्या चौकटीत न अडकवता, त्यांना त्यांच्या इच्छेनुसार मुक्त विचार आणि कृती करण्याचा हक्क मिळावा.
"तिला उंच भरारी घ्यायची आहे,
तिला तिच्या अस्तित्वाची जाणीव आहे,
समाजाच्या जोखडातून ती नक्कीच मुक्त होईल,
कारण तिच्या पंखात स्वाभिमानाची ताकद आहे!"
३. आर्थिक ताणतणाव स्वातंत्र्यासाठी संघर्ष
"तिच्या कष्टांचा मोल कुणा का अजूनही आहे संशयच धूर ?
ती आर्थिक स्वातंत्र्याच्या वाटेवर, पण मिळे का तिच्या श्रमांना सूर?"
आर्थिक स्वातंत्र्य हे केवळ पुरुषांसाठी नाही, तर स्त्रियांसाठीही तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र, आजही अनेक महिलांना आर्थिक तणावाचा सामना करावा लागतो. घरातील जबाबदाऱ्या, नौकरी आणि बचतीचे प्रश्न अपुरे वेतन, तसेच आर्थिक स्वावलंबनासाठी झगडावे लागणे या सर्व गोष्टी स्त्रियांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर मोठा परिणाम करतात.
* महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य आणि त्यातील अडथळे
जरी आज अनेक महिला शिक्षण घेत आहेत, नोकरी करत आहेत, तरीही आर्थिक निर्णय घेण्याच्या बाबतीत त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले जात नाही.
कुटुंबातील आर्थिक निर्णयांतील सहभाग कमी बऱ्याच घरांमध्ये महिलांना आर्थिक निर्णयांमध्ये सहभागी करून घेतले जात नाही.
पुरुषसत्ता आणि आर्थिक विसंगती अनेक ठिकाणी स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत कमी वेतन दिले जाते.
कुटुंबातील जबाबदाऱ्यांमुळे करिअरमध्ये अडथळे - मुलांची काळजी, घरकाम, आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे अनेक स्त्रियांना नोकरी सोडावी लागते
"स्वप्न तिची मोठी होती,पण हात बांधले संसाराने,
ती भरारी घ्यायला तयार होती पण पंख कापले परंपरांनी !"
१. एकाच कमावत्या व्यक्तीवर अवलंबून असणे
अनेक घरामध्ये पुरुष एकटे कमावते अस्तरानी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर असते.
महिलांना आर्थिक निर्णय घेण्याचा किंवा स्वतःच्या कमाईचा हक्क मिळत नाही.
२. कमी वेतन आणि असमानतेचा प्रश्न
अनेक स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत कमी पगार दिला जातो
काही ठिकाणी त्यांना समान संधीच दिल्या जात नाहीत,ज्यामुळे त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य मर्यादित राहते.
३. बचतीचा अभाव आणि आर्थिक अनिश्चितता
घरखर्च सांभाळताना वियांनी स्वतःसाठी बचत करणे गरजेचे असते, पण अनेकदा त्यांना याची संधी मिळत नाही.
भविष्यातील आर्थिक सुरक्षितता न मिळाल्यास स्त्रियांना सतत तणावाचा सामना कराव लागतो.
आर्थिक तणावावर मात करण्यासाठी उपाय :-
१. आर्थिक स्वावलंबनासाठी शिक्षण आणि कौशल्यविकास
महिलांनी स्वतःच्या आर्थिक सुरक्षेसाठी शिक्षण आणि कौशल्ये आत्मसात करणे महत्वाचे आहे.
ऑनलाइन व्यवसाय, गृहउद्योग, आणि कौशल्याधारित नोकऱ्या यामुळे आर्थिक स्वातंत्र्य वाढू शकते.
२. स्वतःची बचत आणि गुंतवणूक करणे
महिलांनी आर्थिक नियोजन शिकले पाहिजे आणि बचतीसाठी स्वतंत्र खाते उघडावे.
गुंतवणूक योजना, विमा, म्युच्युअल फंड, आणि शेअर मार्केट यांचा अभ्यास करून आर्थिक स्थैर्य मिळवता येईल.
३. स्वतःच्या हक्कांची जाणीव ठेवणे
सरकारी योजना आणि महिलांसाठी असलेल्या वित्तीय सुविधा यांचा लाभ घ्यावा.
स्त्रियांसाठी विशेष कर्ज योजना, उद्योगांसाठी प्रोत्साहन योजना यांचा फायदा घेऊन आर्थिक स्वातंत्र्य मिळवावे.
"ती अर्थसाक्षर झाली, ती स्वावलंबी झाली,
आता तिचे भविष्य तिनेच ठरवली"
४. स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
स्त्रियांना आर्थिकदृष्टया स्वावलंबी बनण्यासाठी समाजानेही पाठिंबा दिला पाहिजे. महिलांनी आपल्या कष्टाच्या कमाईवर हक्क गाजवावा, बचत कराची, आणि आर्थिक निर्णय पेण्यात पुढाकार घ्यावा.
"तिला नको हातावर पोट, तिला तिची ओळख हवी,
ती स्वतःच्या कष्टाने उभी, तिला तिचे भविष्य हवे!"
आर्थिक ताणतणाव हा कोणत्याही व्यक्तीसाठी आव्हानात्मक असतो, पण महिलांसाठी तो अधिक कठीण ठरतो. शिक्षण, कौशल्यविकास आणि स्वतःच्या हक्कांची जाणीव ठेवल्यास महिलांना स्वतःच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही, तर त्या आत्मनिर्भर आणि सक्षम होऊ शकतील.
"जिथे स्त्री आर्थिकदृट्ट्या स्वतंत्र आहे,
तिथेच समाज खऱ्या अर्थाने सशक्त आहे!"
स्त्रियांसाठी तणाव व्यवस्थापनाचे मंत्रः-
१. मानसिक आणि भावनिक स्थिरता -
स्वतःवर विश्वास ठेवा - स्त्रीने आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून कोणत्याही परिस्थितीत हार मानू नये.
स्वतःसाठी वेळ द्या - स्वतःच्या आनंदासाठी वेळ काढा, कारण आनंदी स्त्रीच कुटुंबासाठी प्रकाशकिरण असते.
"ती जेव्हा स्वतःला ओळखते, तेव्हा जगही तिच्या सामर्थ्याची साक्ष देतं!"
आरोग्य आणि फिटनेस
नियमित व्यायाम, योगा आणि ध्यानधारणा यामुळे मन शांत राहते आणि तणावावर नियंत्रण ठेवता येते.
पुरेशी झोप आणि संतुलित आहार शारीरिक तंदुरुस्ती मानसिक स्थिरतेसाठी आवश्यक आहे.
३. वेळेचे व्यवस्थापन आणि कार्यक्षम नियोजन
. प्राथमिकता ठरवा - कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे ठरवून त्यानुसार वेळ वाटून घ्या.
. "नाही" म्हणायला शिका प्रत्येक जबाबदारी स्वीकारणे टाळा आणि आपल्या मनःशांतीसाठी काही गोष्टींना नकार द्या.
"ती वेळेला जिंकते, ती नियोजनाने चमकते,
संकटांशी लढता लढता, यशाच्या शिखरावर पोहोचते !"
४. आर्थिक स्वावलंबन आणि बचत
स्वतःचे आर्थिक नियोजन करा पैसे बचत करा, गुंतवणूक करा आणि स्वावलंबी चा
स्वतःचे कौशल्य विकसित करा नवीन कौशल्ये शिकून उत्पनाचे नवीन मार्ग शोधा
५. सामाजिक सहभाग आणि समर्थन गट
समाजात स्त्रियांनी केवळ आपल्या मर्यादित चौकटीत राहू नये, तर त्यांना एकत्र येऊन परस्परांना प्रेरणा द्यावी, एकमेकींना मदत करावी आणि सहकार्याच्या माध्यमातून अधिक सक्षम बनावे. सामाजिक सहभाग आणि समर्थन गट हे महिलांसाठी मानसिक, भावनिक आणि व्यावसायिक स्तरावर आधार देणारे महत्त्वाचे माध्यम ठरू शकतात.
६. महिला संघटनांमध्ये सहभागी व्हा
वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये सहभागी होऊन महिलांनी आपली उपस्थिती वाढवली पाहिजे.
. स्वयं-सहायता गट - लघुउद्योग, बचत गट, आणि कौशल्यविकास कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्याने
महिलांचे आर्थिक सक्षमीकरण शक्य होते.
. एनजीओ आणि सामाजिक चळवळी समाजातील अन्याय, महिलांवरील अत्याचार, आणि लैंगिक भेदभाव याविरोधात कार्यरत असलेल्या संघटनांमध्ये सहभागी व्हावे.
७. स्वतःच्या हक्कांबाबत जागरूकता वाढवा
स्त्रियांवरील अन्याय आणि अत्याचार रोखण्यासाठी महिला कायदे, हक्क आणि शासनाच्या योजना यांची माहिती ठेवणे आवश्यक आहे.
गरज असल्यास कायदेशीर मदतीसाठी महिला आयोग किंवा पोलिस प्रशासनाचा आधार घ्यावा.
८. महिलांसाठी मानसिक आधार गट तयार करणे
महिलांना भेडसावणाऱ्या मानसिक आणि भावनिक समस्यांवर चर्चा करण्यासाठी त्यांच्या घेण्यासाठी आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी समर्थन गट (Support Groups) तयार करावेत.
वैयक्तिक समस्यांवर खुलेपणाने बोलण्याचा विश्वास आणि आधार यामुळे तणाव व्यवस्थापन सोपे होते.
९. नेतृत्व आणि राजकीय सहभाग वाढवणे
स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामसभा आणि महिला सक्षमीकरण कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन निर्णय प्रक्रियेत भूमिका बजवावी.
महिलांनी नेतृत्वगुण विकसित करून समाजाच्या प्रगतीसाठी पुढाकार घ्यावा.
"एकत्र येऊन चालल्या तर, शक्य काय अन अशक्य काय?
तिने ठरवलं तर, तिच लिहील तिच्या यशाचं नव्यानं पान!"
१०. डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर
महिलांनी आपले विचार आणि समस्या मांडण्यासाठी सोशल मीडियाचा योग्य वापर करावा.
महिलांसाठी असलेल्या ऑनलाईन समुदायांमध्ये सहभाग घेऊन एकमेकांना प्रेरणा द्यावी.
"स्त्रीशक्ती जेव्हा एकत्र येते, तेव्हा क्रांती घडते,
नव्या उर्जेने समाज पुढे जातो, आणि इतिहास घडतो।"
समारोप स्त्रीशक्तीचे अखंड तेज"
स्त्री ही केवळ जबाबदाऱ्या पेलणारी मूक कर्तव्यपूर्ती करणारी व्यक्ती नाही, तर ती एक ज्वलंत शक्ती आहे. संकटांना सामोरे जाण्याची तिची जिद्द, परिस्थितीवर विजय मिळवण्याची तिची क्षमता, आणि अडथळ्यांवर मात करण्याची तिची इच्छाशक्ती हीच तिची खरी ताकद आहे. आजच्या जगात स्त्रियांना केवळ ताण सहन करणाऱ्या म्हणून नव्हे, तर त्या ताणाचे व्यवस्थापन करणाऱ्या आणि त्यावर मात करणाऱ्या योद्धा म्हणून पाहिले पाहिजे. कोणतीही मर्यादा तिला अडवू शकत नाही, कोणताही अडथळा तिला रोखू शकत नाही-ती फिनिक्स पक्ष्यासारखी आहे, जिथे जळते तिथूनच नव्याने जन्म घेते.
"तिला अडवता येईल का? ती तर वादळाची झुळूक!
संकटांनी घेरलं तरी, तीच उभी राहील ताठ मानेने, तेजस्वी दीपक!"
"स्त्री ही केवळ सहनशीलतेचा पुतळा नाही,
ती संघर्षशीलतेचा दीपस्तंभ आहे !
तिच्या कर्तृत्वाचा सूर्योदयच समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनिवार्य आहे !"
श्रीमती सुलक्षणा किसनराव भरगंडे
शेळगी ,सोलापूर