मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनाच्या लॉबीत तुफान हाणामारी झाली आहे. यामुळे विधानभवन परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. दरम्यान, यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. विधानभवन परिसरात मारामारी होणं हे विधानभवनाला शोभणारे नाही. विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती यांना घटनेची चौकशी करून तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे.
विधिमंडळाचे अधिवेशन चालू असताना विधानभवनाच्या परिसरात जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते समोरासमोर आले. यावेळी गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश कटले याने जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांना मारहाण केली असून, शिवीगाळही करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत घटनेचा अहवाल मागवला आहे. या घटनेची आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील गंभीर दखल घेतली आहे.
घडलेली घटना ही अतिशय चुकीची आहे. विधानभवनात अशा प्रकारची घटना घडणे योग्य नाही. विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती यांच्या अंतर्गत विधानभवनाचा परिसर येतो. त्यामुळे या दोघांनीही घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी. तसेच यावर कडक कारवाई करावी, अशी विनंती मी विधानसभा अध्यक्षांना केल्याचे त्यांनी सांगितले. विधानभवनाच्या परिसरात लोक मोठ्या प्रमाणात जमा होतात आणि मारामारी करतात हे विधानभवनाला शोभणारे नाही. म्हणूनच यावर निश्चित कारवाई ही झालीच पाहिजे, अशी भूमिकाही यावेळी फडणवीस यांनी स्पष्ट केली.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवनाच्या लॉबीत घडलेला प्रकार मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या लक्षात आणून दिला असून, यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनाही या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घटनेची गंभीर दखल घेत विधानसभा अध्यक्षांनी कठोर कारवाई करावी, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष या प्रकरणावर काय निर्णय घेतात? आणि ते कोणत्या पद्धतीने कारवाई करतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.