उरण : नोकरी लावून देतो असे सांगून पैसे उकळविण्याचे अनेक गैरप्रकार समाजात मोठया प्रमाणात घडत आहेत. अशा घटनाना वेळीच आळा बसने महत्वाचे आहे. अशा घटना वाढत असतानाच उरण न्यायालयाने एक सर्वांसाठी दिलासादायक निकाल दिला आहे. या निकाला मुळे आर्थिक फसवणूकीला आळा बसेल अशी आशा अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे.आर्थिक फसवणूक मधील एका केसमधील आरोपी याने फिर्यादी यांचेकडून रक्कम रुपये ५,००,०००/-(अक्षरी रुपये पाच लाख) स्विकारुन व इतर २१ पिडीतांकडू देखिल पैसे स्विकारुन १ महिन्यात NAD मध्ये कायमस्वरुपी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून, प्रत्यक्षात कोणतीही नोकरी न लावून देता त्यांची फसवणूक केली म्हणून आरोपी नामे संतोष अनंत पेढवी यांचे विरोधात उरण पोलीस ठाणे मध्ये नियमित फौजदारी खटला क. ७०/२०२०, गु.र.न. २१/२०२०, भा.द.वि. कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल केला होता.
सदरचा खटला उरण येथील मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. एस. काझी उरण न्यायालय क्र. १ यांचे न्यायालयात चालू असताना सदर खटल्यामध्ये न्यायालयाने आरोपी संतोष अनंत पेढवी यांस दोषी ठरवून भा.द.वि. कलम ४२० अन्वये ३ वर्षे सश्रम कारावास व रक्कम रुपये ५०,०००/- (अक्षरी रुपये पन्नास हजार) दंड व दंड न भरल्यास २ महिने साधा कारावास देण्याचा आदेश पारीत केला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर आर्थिक फसवणुकीला बळी पडू नका. कोणत्याही अमिषाला बळी पडू नका. पैसे देऊन कुठेही नोकरीला लागू नका. कोणत्याही एजेंटच्या नादी लागू नका. उरण न्यायालयाने चांगला निकाल दिला आहे. या निकाला मुळे गुन्हेगारीला आळा बसणार आहे असे मत उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हानीफ मुलाणी यांनी व्यक्त केले.