मुंबई : संयुक्त राष्ट्रांच्या प्रकल्प सेवा कार्यालयाने (यूएनओपीएस) मेसर्स टेकइन्व्हेन्शन लाइफकेअर मार्फत इथिओपियातील सार्वजनिक आरोग्य अधिकारी आणि लस तज्ज्ञांचे शिष्टमंडळ परळ येथील हाफकिन शिक्षण, संशोधन आणि चाचणी संस्थेला लस विश्लेषणावरील विशेष प्रशिक्षणाकरिता भेट दिली. या उपक्रमाचा उद्देश दोन्ही देशांमधील आरोग्य क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करणे हा आहे.इथिओपियाच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाचे वरिष्ठ सल्लागार हैलू अशेनाफी डेनिसे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचे स्वागत हाफकिन संस्थेच्या संचालिका डॉ. सुवर्णा खरात यांनी केले. त्यांनी संस्थेतील संशोधन उपक्रम, नवोन्मेषी प्रकल्प आणि भविष्यातील संयुक्त सहकार्याच्या संधींबाबत सविस्तर माहिती दिली.
प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालक तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अजय चंदनवाले आणि हाफकिन जैव औषध निर्माण महामंडळाचे महाव्यवस्थापकीय संचालक सुनील महेंद्रकर यांच्या हस्ते झाले. डॉ. चंदनवाले यांनी दोन्ही देशांमध्ये संयुक्त संशोधन आणि नावीन्यपूर्ण प्रकल्प राबविण्याबाबत प्रस्ताव मांडला. महेंद्रकर यांनी या सहकार्यामुळे आरोग्य क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील, असे नमूद केले.
शिष्टमंडळाने परळ येथील ओरल पोलिओ लस उत्पादन केंद्राला भेट देऊन कार्यपद्धतीची माहिती घेतली. ९ डिसेंबर पर्यंत हा उपक्रम असून प्रशिक्षणादरम्यान विषाणूशास्त्र आणि सेल बायोलॉजी विभागाच्या सहायक संचालिका डॉ. उषा पद्मनाभन यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ पथक शिष्टमंडळाला मार्गदर्शन करणार आहे.भारत–इथिओपिया आरोग्य सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हे पाऊल अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असून स्थिरता, प्रगती आणि परस्पर विकासाच्या उद्दिष्टांना अधिक बळ मिळणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.