पुणे: पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा परिसरात अचानक आग लागल्याची घटना घडल्याने काही काळ नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. शनिवार वाड्याजवळील देसाई कॉलेजसमोर झाडांचा पालापाचोळा आणि सुकलेल्या फांद्यांना आग लागली होती. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता.
घटनेची माहिती मिळताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी तत्परतेने प्रयत्न करत आग पूर्णपणे नियंत्रणात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाल्याची माहिती नाही.
आगीच्या ज्वाळा शनिवार वाड्याच्या एका दरवाजाजवळपर्यंत पोहोचल्याने काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अग्निशमन दलाच्या वेळेवर केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.दरम्यान, या घटनेमुळे परिसरात साचलेले वाळलेले गवत, पालापाचोळा आणि स्वच्छतेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. इतिहासप्रसिद्ध शनिवार वाडा हा बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्या काळातील अनेक ऐतिहासिक आठवणी जपणारा वारसा स्थळ असल्याने परिसरातील सुरक्षितता आणि स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.