मुंबई: आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या तणावाचा परिणाम भारतातील ऊर्जा पुरवठ्यावर होण्याची शक्यता व्यक्त होत असताना राज्यातील गॅस वितरणाबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र गॅस सिलेंडरच्या तुटवड्याबाबत पसरत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीआणि केंद्र सरकार संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असून गॅस पुरवठा सुरळीत राहील यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गॅस आणि इंधन पुरवठ्याबाबत केंद्र सरकार अत्यंत गंभीरतेने परिस्थितीचा आढावा घेत आहे. नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी राज्य आणि केंद्र सरकार समन्वयाने काम करत असल्याचे शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. काही ठिकाणी गॅस वितरणाबाबत चुकीच्या बातम्या पसरवल्या जात असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारच्या माहितीनुसार गॅस सिलेंडरचा प्रत्यक्षात कोणताही तुटवडा नाही. ग्रामीण भागातील ग्राहकांना सुमारे ४५ दिवसांच्या अंतराने, तर शहरी भागात सुमारे २५ दिवसांच्या अंतराने नियमित पुरवठा केला जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये तहसील कार्यालयांच्या माध्यमातून विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. ही पथके गॅस एजन्सी आणि गोदामांमध्ये तपासणी करून कनेक्शनची संख्या, सिलेंडर साठा आणि वितरण व्यवस्था याची पडताळणी करत आहेत.
सध्या व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वितरण तात्पुरते थांबवण्यात आले असले तरी घरगुती गॅसचा पुरवठा सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच भरोसा ठेवावा, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुंबईत कच्च्या तेलाचे जहाज दाखल
दरम्यान, आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचा पुरवठा सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ‘शिलॉग’ नावाचे जहाज हार्मुज सामुद्रधुनी पार करून मुंबई किनाऱ्यावर दाखल झाले आहे. या जहाजामध्ये सुमारे १ लाख ३५ हजार मेट्रिक टन कच्चे तेल असल्याची माहिती मिळाली असून हा साठा माहुल येथील रिफायनरीकडे पाठवला जाणार आहे. युद्धसदृश परिस्थितीनंतर मुंबईत कच्चे तेल घेऊन आलेल्या पहिल्या जहाजांपैकी हे एक असल्याचे सांगितले जात