सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

एका मराठी चित्रपटाचे स्कॅाटलॅंडमध्ये शूटिंग सुरू असताना अभिनेता पुष्कर जोग झाला जखमी

पुजा    28-04-2024 12:22:30

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीचा अभिनेता म्हणजे पुष्कर जोग. पुष्करला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. पुष्कर जोग सोशल मीडियावरही चांगलाच सक्रीय असतो. पुष्कर सध्या त्याच्या आगामी सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. पण पुष्करच्या चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर येतेय. आगामी सिनेमाच्या शुटींगदरम्यान पुष्करला गंभीर दुखापतीला सामोरं जावं लागलं आहे. काही दिवसांपूर्वीच  पुष्कर जोगनं 'धर्मा- दि एआय स्टोरी' या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा केली होती होती. एआयवर आधारित हा पहिलाच मराठी चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचं स्कॅाटलॅंडमध्ये शूटिंग सुरु असताना अ‍ॅक्शन सीन करताना झालेल्या अपघातात पुष्कर जोग याला गंभीर दुखापत झाली. या अपघातात त्याच्या गुडघ्याला आणि हाताला जबर मार बसला आहे. 

दरम्यान, पुष्कर जोग मुंबईत दाखल झाला असून लवकरच तो या चित्रपटाच्या शूटिंगला पुन्हा सुरुवात करणार असल्याचं समजतं. पुष्करने स्वतः  सोशल मीडियावर पोस्ट करुन ही माहिती दिली आहे, त्याने लिहिलंय, "काल एका अॅक्शन सीक्वेन्सचं शुटींग करताना माझ्या हाताला आणि गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. खुप दुखतंय. खुप कठीण दिवस" पुष्करने ही पोस्ट लिहून सर्वांना त्याला झालेल्या दुखापतीची माहिती दिली. ही पोस्ट शेअर पुष्करच्या अनेक चाहत्यांनी त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. पुष्कर सुद्धा दुखापतीवर उपचार घेताना दिसत आहे. 

पुष्कर जोगच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर अभिनेता आणि दिग्दर्शक अशी ओळख असलेला पुष्कर व्हिक्टोरिया, बाप माणूस आणि मुसाफिरा या चित्रपटानंतर तो आता 'धर्मा- दि एआय स्टोरी' चित्रपटाचं शूटिंग करत आहे. हा चित्रपटही बाप आणि लेकीचं नातं अधोरेखीत करणारा आहे. "लाईट्स कॅमेरा अँड आणि AI च्या जंजाळात आपल्या मुलीच्या शोधात एका बापाचा प्रवास..." अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. याच सिनेमाच्या शुटींगदरम्यान पुष्करला दुखापत झाली. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित हा पहिलाच मराठी चित्रपट असणार असून काहीच दिवसांपुर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाविषयी महत्वाचे सांगायचे म्हणजे  'धर्मा- दि एआय स्टोरी' या चित्रपटात अभिनय करण्याबरोबरच पुष्कर या चित्रपटाचं दिग्दर्शनही करत आहे. यामध्ये त्याच्यासह दीप्ती लेले आणि स्मिता गोंदकर काम करत आहेत. पल्लवी वैद्य यांनी या चित्रपटाची कथा लिहली असून या पुष्करसाठी हा खूप महत्त्वकांक्षी चित्रपट आहे. 

याशिवाय पुष्करचा 'बापलेक' हा सिनेमाही या वर्षी रिलीज झाला होता. यामध्ये सिंगल पेरेंट असलेल्या बापाची आणि मुलीची कथा दाखवण्यात आली आहे. आपल्या मुलीच्या संगोपनात तो सर्वस्व पणाला लावून लेकीची काळजी घेत असतो. तिला आईच्या प्रेमाची उणीव भासू नये यासाठी तो सतत प्रयत्न करतो. एका भावनिक आणि गुंतागुंतीच्या विषयाला प्रथितयश दिग्दर्शक योगेश फुलफगर यांनी हात घातल्याचं या चित्रपटात दिसलं. यातील पुष्करच्या भूमिकेचंही खूप कौतुक झालं.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती