सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

सप्तपदी म्हणजे काय

डिजिटल पुणे    03-05-2024 09:59:47

सप्तपदी म्हणजे काय

लग्नातील सप्तपदी लग्नातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सात पाऊल आणि त्याबरोबर दिली जाणारी वचनं. या गोष्टीला सप्तपदी असं म्हटलं जातं. ही सप्तपदी वर आणि वधू  एकमेकांबरोबर एकत्र करावी लागते. प्रत्येक पाऊलनंतर दोघंही एकमेकांना वचन देतात, जे त्यांच्या आयुष्याशी निगडीत असतात. या सात वचनांचा अर्थ दोघांनी आयुष्यभर एकमेकांची साथ देणं हाच आहे. पाच तत्वाचे पंचकलश साक्षीने माहेश्वरमंत्रजागरात ही वचनं दिली जातात. तसंच यावेळी ध्रुव ताऱ्यालाही साक्ष ठेवण्यात येतं. ध्रुव ताऱ्याची ज्याप्रमाणे अढळ जागा आहे, त्याचप्रमाणे एकमेकांच्या आयुष्यात अढळ जागा राहो यासाठी ध्रुव ताऱ्याची साक्ष घेण्यात येते. सप्तपदीच का? असाही प्रश्न लोकांना पडतो. त्याचं खास कारण आहे की, शरीरामध्ये सात चक्र, सात सूर, इंद्रधनुष्याचे सात रंग, ऋषी सात, धातू सात, सात द्वीप, सात परिक्रमा या सर्व गोष्टी सात असल्यामुळेच सप्तपदीला महत्त्व आहे. माहेश्वरनी सांगितलेली वचनं वधू वर यावेळी पुन्हा म्हणतात. हल्ली वधू वरआपली स्वतःची वचनंही घेतात.

पहिले पद, पहिले वचन 

लग्नाच्या या सप्तपदीचा पहिला वधू पाऊल ठेवताना वधू वर देवाकडून आशीर्वाद मागतात की, त्यांच्या आयुष्यात कधीही धन अथवा खाण्यापिण्याची कमी न पडो. तसंच  वर यावेळी कल्याण व्हावं आणि नेहमी आनंद देण्याचं वचन देतो तर त्याचवेळी नवरीवधू येणाऱ्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचं वचन देते. दोघेही एकमेकांना योग्य सन्मान देत आयुष्यामध्ये हव्या असलेल्या गोष्टींचं ध्येय पूर्ण करण्यासाठी एकत्र पुढे चालतील अशी प्रार्थनाही यावेळी करतात.

दुसरे पद, दुसरं वचन

दुसऱ्या पदाच्या वेळी युगुल मानसिक, भावनात्मक आणि आध्यात्मक या सर्व पातळ्यांवर एकता हवी असल्याचं वचन देते. एकमेकांवर कायम प्रामाणिकपणाने प्रेम करत राहण्याचं वचन या दुसऱ्या पदामध्ये दोघेही एकमेकांना देतात. दोन शरीर असूनही एक मन असल्याप्रमाणे एकमेकांच्या आयुष्यात मदत करण्याचं वचन देतात. जीवनामध्ये अनेक चढउतार येत असतात.  त्या प्रत्येक चढउतारामध्ये एकमेकांची सुरक्षा करण्याचं आणि साथ देण्याचं वचन आणि सर्व काही एकत्र सहन करण्याची ताकद असण्याचं वचन या पदामध्ये दिलं जातं.

तिसरे पद, तिसरं वचन 

संसारीक जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी तिसरं पाऊल पुढे टाकताना वधू वर देवाकडून धन आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात. अध्यात्मिक सेवा पूर्ण करण्यासाठीही आपल्या सक्षम करावं यासाठीदेखील प्रार्थना करतात. शिवाय आपल्या होणाऱ्या संततीची योग्य काळजी घेता येईल, त्यांना योग्य शिक्षण आणि त्यांच्या गरजा योग्य तऱ्हेने पूर्ण करता येतील यासाठी योग्य क्षमता देण्याची आणि त्यासाठी लक्ष ठेवण्याची प्रार्थना यावेळी हे युगुल देवाकडे करतं. तर आयुष्यभरासाठी एकमेकांसाठी शारीरिक आणि अध्यात्मिक प्रामाणिकपणा निभावण्यासाठीही देवाकडे आशीर्वाद मागतात.

चौथं पद, चौथं वचन

भारतीय समाजात कुटुंबांमध्ये एकात्मता दिसून येते. वरीष्ठांचा सन्मान आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी करणं हादेखील सामाजिक मूल्याचा एक भाग आहे. आपल्या कुटुंबातील योग्य मूल्य राखून ठेवण्यासाठी आणि कुटुंबामध्ये एकता कायम राखण्यासाठी नवरा आणि नवरी देवाकडून आशीर्वाद मागतात. कुटुंबामध्ये सगळ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत आणि सर्वांशी मिळून मिसळून राहण्यासाठीदेखील शुभेच्छा आणि आनंद आणण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यात येते. तसंच नवरी कोणत्याही परिस्थितीत आपल्या नवऱ्यावर कायमस्वरूपी प्रेम करण्याचं वचन देते.

पाचवं पद, पाचवं वचन 

नव्या जीवनाची एकत्र सुरुवात करताना, आपल्या भावी संततीसाठीही आशीर्वाद मागितला जातो. आपल्या पोटी एक छान आणि महान मूल जन्माला यावं जे आपल्या कुटुंबाचं नाव उज्ज्वल करून पुढे व्यवस्थित जबाबदारी सांभाळेल असा आशीर्वाद मागितला जातो. त्याचबरोबर होणाऱ्या मुलाचे उत्कृष्ट आई - वडील होण्याचं वचन एकमेकांना दिलं जातं. तसंच त्यांना योग्य पालन पोषण देऊन मोठं करण्याचंही वचन देण्यात येतं. यावेळी पती आपल्या पत्नीला नेहमीच मित्राचा दर्जा देण्याचं वचन देतो. तर पत्नी आपलं नातं हे नेहमी प्रेमाने बांधून ठेवण्याचं वचन देते.

सहावं पद, सहावं वचन 

प्रामाणिक आणि चांगलं आयुष्य जगण्यासाठी देवाजवळ पती आणि पत्नी प्रार्थना करतात. तसंच दोघांनाही चांगलं आरोग्य मिळावं यासाठी प्रार्थना केली जाते. आपल्या कुटुंब आणि मुलांप्रती सर्व जबाबदाऱ्या योग्य तऱ्हेने निभावण्यासाठी देवाकडे चांगल्या आरोग्याची मागणी करण्यात येते. नवरा आणि नवरी एकमेकांबरोबर एक संतुलित आणि आनंदमयी जीवन जगण्याची इच्छा यावेळी करतात.

सातवं पद, सातवं वचन 

अंतिम वचन, जे हे पवित्र गठबंधन अधिक मजबूत बनवतं. एकमेकांवर प्रेम करण्याचं, विश्वास आणि सहयोग देण्याचं वचन यावेळी देण्यात येतं. दोघेही कायम एकमेकांचे मित्र होतील अशी शपथ घेतात. कोणत्याही परिस्थितीत एकमेकांबरोबर न डगमगता उभं राहण्याचंही वचन यावेळी देण्यात येतं. तसंच आयुष्यात काहीही झालं तरीही एकमेकांबरोबर नेहमी खरं बोलायला हवं ही सत्य परिस्थितीदेखील यावेळी वचनातून समोर येते. आपल्या आयुष्यातील गोडवा आणि प्रेम कायम असंच राहो अशीही यावेळी देवाकडे प्रार्थना करण्यात येते.

प्रत्येक धर्म आणि संस्कृतीमध्ये वेगवेगळी वचनं असतात. पण त्याचा भावार्थ हा एकमेकांप्रती प्रेम, भक्ती, सन्मान आणि प्रामाणिकपणा हाच असतो. या सर्व वचनांचा एकच अर्थ असतो की, आयुष्यात एकमेकांना कायम प्रामाणिकपणे साथ द्यायची आहे. तसंच मृत्यूच्या आधी कोणीही एकमेकांपासून दूर होणार नाही असंही वचन यावेळी देण्यात येतं.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती