सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

मंगलाचरणनाम (भाग १)

डिजिटल पुणे    05-05-2024 10:41:48

मंगलाचरणनाम (भाग १)

संसार हाचि दीर्घ स्वप्न | लोभे वोसणाती जन | माझी कांता माझे धन | कन्या पुत्र माझे ||७/१/२०||

संसार हेच एक मोठे स्वप्न आहे. त्या स्वप्नात आसक्तीच्या आहारी जाऊन माझी बायको, माझा पैसा, माझी मुलेबाळे असे लोक बडबडतात.

सातव्या दशकाच्या पहिल्या समासाच्या आरंभी श्रीसमर्थ श्रीगणपती, श्रीशारदा, श्रीसद्गुरु यांना वंदन करतात. विद्यावंतांचा मूळपुरुष, ज्याच्यापासून सर्व विद्या उत्पन्न होतात, त्याच्यापाशी सर्व कर्तुत्वाचा उगम आहे. विश्वाचे उगमस्थान, स्वयंभू असा तो आहे. विश्व निर्मिती करताना शुद्ध परमात्म स्वरूप मानवी कल्पनेच्या कक्षेत येते. त्यावेळी ज्ञान आणि कर्तुत्व या दोन गोष्टी अनुभवाला येतात. ते ज्ञान अंग श्रीगणेश तर कर्तुत्व अंग श्रीशारदा आहे. मुळात हे दोन एकरूपच आहेत. या स्वयंभू स्वरूपाला शारदा ही स्फुरण रूप कन्या झाली. नंतर तीच आई देखील झाली. ती परमात्म स्वरूपातून बाहेर येते म्हणून कन्या पण नंतर त्याला साक्षी बनवते म्हणून आई आहे. ती इच्छामय, गतीमय आहे. तीच मूळमाया आदिशक्ती आहे. ती द्वैताला जन्म देते पण स्वत: परमात्म्याशी अद्वैतरूप आहे. हिच्या पोटी अनंत ब्रह्मांडे सामावलेली आहेत. तिला मिथ्या म्हणावे तर त्यासाठी तिचे अस्तित्व मानावे लागते. तिला वेगळेपणाने पाहिले तर तिच्याविषयी काही बोलता येते. पण हे पाहणे, बोलणे म्हणजे तिच्या अंमलाखाली येणेच आहे. अशा तऱ्हेने ती गुंतवून टाकते.

आनंद जन्मास घालणाऱ्या सद्गुरूंना देखील श्रीसमर्थ वंदन करतात. जे सायुज्यमुक्ती दाखवतात. मुमुक्षुने चातका प्रमाणे सद्गुरूंच्या करुणामय आकाशाकडे डोळे लावून वाट पाहत बसावे तेव्हा कुठे सद्गुरू कृपेचा ढग आनंदाची वृष्टी करतो. धर्मामृताचा ढग असा बरसल्याने ही शिष्याची धर्म मेघ समाधी समजावी. सद्गुरू काळावर राज्य करतात, संकटातून सोडवतात, शरणागत शिष्यावर प्रेम करतात. शिष्याला सांभाळणारी जणू ते आईच आहेत. अशा सद्गुरूंना समर्थ देहाशिवाय म्हणजे मी देह आहे ही भावना विसरून, समरस होऊन नमन करतात. आणि आपल्या मूळ विषयावर येतात. ते या समासात सांगत आहेत की -

ज्ञानसूर्य मावळल्याने अज्ञानाचा अंधार पडला आणि जीव आत बाहेर अज्ञानाने व्यापून गेला. माझे माझे करू लागला. तम-रजाच्या या अज्ञान अंधारात सत्वाच्या चांदण्याला देखील तो पारखा झाला. त्यामुळे ज्ञानाचा मार्ग थोडाही दिसेनासा झाला. भ्रमाने वेढल्याने त्याला दिसणारे दृश्य सत्य वाटू लागले. स्वस्वरूप अनुभव येईनासा झाला. अज्ञानरुपी झोपेत देहाभिमानाने घोरू लागला. इंद्रिय सुख मिळाले नाही तर दु:खी होऊ लागला. रडू लागला. अज्ञानी जीव अशा रीतीने झोपेत मारतात आणि परत जन्माला येतात. आणि परत झोपी जातात. अशा येरझाऱ्या करण्यात त्याचे कित्येक जन्म गेले आहेत.

या अज्ञानातून मुक्त होण्यासाठी सद्गुरू अध्यात्म ग्रंथ निर्माण करतात. अध्यात्मविद्या ही इतर विद्यांपेक्षा श्रेष्ठ आहे असे भगवान श्रीकृष्ण गीतेत दहाव्या सांगतात.

अध्यात्मविद्या विद्यानां वाद: प्रवदतामहम् ||

संशोधन व लेखन – कथाव्यास श्री. दामोदर प्र. रामदासी, पुणे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती