सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 जिल्हा

‘व्यवस्थापन लेखांकन दिना’निमित्त राज्यपालांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन

डिजिटल पुणे    07-05-2024 10:16:37

मुंबई : देशाच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासात व्यवस्थापन लेखापालांचे योगदान लक्षणीय आहे. तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट गाठताना, व्यवसाय सुलभता वाढविण्याच्या कार्यात व्यवस्थापन लेखापालांची भूमिका महत्वपूर्ण असेल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन लेखांकन दिनाचे औचित्य साधून व्यवस्थापन लेखांकन व्यवसायाचे नियमन करणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICMAI) या राष्ट्रीय संस्थेतर्फे आयोजित चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. 6) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

अर्थव्यवस्था वाढत असताना व्यवस्थापन लेखापालांची मागणी वाढणार असून खासगी तसेच सरकारी संस्थांमध्येही या क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी सेवेच्या संधी निर्माण होतील, असे राज्यपालांनी सांगितले.कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे शिक्षण, आरोग्य सेवा, उत्पादन, बँकिंग, ग्राहक सेवा यांसह व्यवस्थापन लेखा क्षेत्रात परिवर्तनकारी बदल होत आहेत. मात्र, सायबर हल्ल्यांचे धोके वाढत आहेत. या दृष्टीने व्यवस्थापन लेखापालांनी सायबर सुरक्षेबाबत धोके कमी करण्यासाठी प्रभावी आणि परवडणारी प्रणाली विकसित करणे आवश्यक आहे असे राज्यपालांनी सांगितले.

विविध क्षेत्रांमधील कौशल्यांमुळे अनेक शतके भारत जगातील आर्थिक महासत्ता होती. आज कौशल्य व पुनर्रकौशल्यावर भर देण्यात येत असून कौशल्य विकास कार्यात आयसीएमएआय संस्थेने शासनाला सहकार्य करावे तसेच आर्थिक साक्षरता वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे असे आवाहन राज्यपालांनी केले.

उद्घाटन सत्राला भारतीय व्यवस्थापन संस्था आयआयएम मुंबईचे संचालक प्रा. मनोज तिवारी, इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष अश्विन दलवाडी, उपाध्यक्ष बी बी नायक, व्यवस्थापन लेखांकन समितीचे अध्यक्ष नीरज जोशी, डॉ. आशीष थत्ते, चैतन्य मोहरीर, संस्थेचे सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते.  संस्थेतर्फे ‘व्यवस्थापन प्रबंधन क्षेत्रातील संधी व नवी आव्हाने : शाश्वत वृद्धी आणि सायबर सुरक्षा’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती