सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 व्यक्ती विशेष

महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आहेत कोट्याधीश ; वाचा किती आहे संपत्ती

पुजा    26-04-2024 17:56:44

पुणे : लोकसभा निवडणुकांची तयारी राज्यासह देशात जोरदार सुरू झाली आहे. आज दुसऱ्या टप्यातील मतदान हे १३ राज्यातील ८९ लोकसभा मतदारसंघात होत आहे. यात महाराष्ट्रातील आठ जागांचा समावेश आहे. दुसरीकडे काल तिसऱ्या टप्प्यातील होणाऱ्या मतदानासाठी राज्यात अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यात आले. पुणे लोकसभा मतदारसंघातुन महायुतीकडून असणारे मुरलीधर मोहोळ यांनी देखील काल मोठे शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील त्यांच्या रॅलीत सहभागी झाले होते. 

दरम्यान आता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार मुरलीधर मोहोळ यांची एकूण संपत्ती २४ कोटी ३२ लाख ४४ हजार ४८३ रुपये असल्याचे समोर आले आहे. यामध्ये मोहोळ यांच्यावर १४ कोटी ८५ लाख रुपयांचे कर्ज आहे. मुरलीधर मोहोळ, त्यांची पत्नी आणि दोन मुली यांच्या नावाने एकूण जंगम मालमत्ता ५ कोटी २६ लाख ७६ हजार ७८८ रुपये इतकी आहे. यामध्ये मोहोळ यांच्या केवळ ९ हजार १९२ रुपयांची रोख आहे. तर पत्नीच्या हातात १ लाख २१ हजार १२४ रुपये रोख आहे. मोहोळ यांच्या नावाने बँकेमध्ये ६६ लाख ७४ हजार २०७ रुपयांची ठेवी आहेत, पत्नीच्या नावाने २ लाख ७१ हजार २७३ तर दोन मुलींच्या नावाने प्रत्येकी अनुक्रमे ४९ हजार ९८१, १०६८९ रुपये इतक्या रुपयांच्या ठेवी आहेत.

मोहोळ यांची एकूण स्थावर मालमत्ता १९ कोटी ५ लाख ६७ हजार ६९५ इतकी आहे. त्यामध्ये मुळशी तालुक्यातील मुठा गावात ३६ गुंठे, कासार आंबोळी येथे २७ गुंठे, भूगाव येथे १४ गुंठे जमीन आहे. तर वाई तालुक्यातील येरुली गावात ३.१८ एकर जमीन आहे. पुणे शहरात कोथरूड येथे एक ५ हजार २४५ चौरस फुटाचा बंगला असून त्याची किंमत ५ कोटी ४७ लाख ८१ हजार ११४ इतकी आहे. तर ४५० चौरस फुटाच्या फ्लॅटची किंमत ३४ लाख ४० हजार इतकी आहे. मोहोळ यांच्या कुटुंबाकडे ४१ तोळे सोन्याचे दागिने आहेत. ज्यांची किंमत २९.४५ लाख इतकी आहे. तर २२ लाख १४ हजार ३८२ रुपयांचे एकच वाहन आहे. 

मोहोळ यांची संपत्ती पुढील प्रमाणे : 

स्थावर मालमत्ता -१९.०५ कोटी

बॅंकेतील ठेवी - ६६.७४ लाख

कर्ज - १४.८५ कोटी

वाहने - २२.१४ लाख

शेअर्स - ३.९६ कोटी

एकूण - २४.३२ कोटी


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती