सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

गोष्ट आमच्या लग्नाची, सारिका संतोष मिसाळ; यांनी सांगितल्या लग्नाच्या अनोख्या गंमती जमती

डिजिटल पुणे    25-04-2024 14:25:07

"शादी का लड्डू जो खाये ओ पछताये

और जो ना खाये ओ भी पछताये

जसे म्हणतात ना, 'घर पहावे बांधून आणि लग्न पहावे करून जसे अनुभवा शिवाय कोणाला ज्ञान मिळत नाही, तसे, पहायला गेलं तर प्रत्येकाचे लग्न हे ज्याच्या. त्याच्या साठी खास असते, स्वतंत्र जीवनातून एकत्र जीवनात प्रवेश होतो मी पासून चा आपण पर्यंतचा प्रवास हा विलक्षण असतो. पाहुणे पहायला आल्या पासून ते अक्षता पडे पर्यंत खूप काही अनुभवायला मुलाला व मुलीला मिळते. घरात चाललेली लगिन घाई याने वेगळंच घराचं रुप भासते,

आज मी आपल्याला गोष्ट माझ्या लग्नाची सांगणार आहे. असा कधी विचार केला नव्हता की, आपल्याही लग्नाची एखादी गोष्ट तयार होऊ शकते, माझ ही लग्न तुमच्या सारखं कांदेपोहे खाऊ घालून ठरवून झाले पाहुणे बघायला येणं हा माझ्या साठी न आवडणारं काम मी आईला सांगायचे मला कोणासमोर ही नाही जायचे. मी काही वस्तू नाही बाजारातील कोणीही या बघून जावा तसे मला एक दोनच, तरी तो कार्यक्रम मला आवडायचा नाही. हि पद्धतच चुकीची आहे असे मी म्हणत असे मला शिकायचं होतं त्यामुळे मी लग्न या विषया पासून लांबच राहत होते.

मला अजूनही आठवते जेव्हा माझे आहो मला पहायला आले होते तेव्हा उन्हाळा सुरु होता. मी ग्रॅज्युएशनच्या सेकंड ईयर ची परीक्षा देऊन नुकताच त्याचा निकाल लागला होता आणि थर्ड इयरच्या ऍडमिशन ची प्रोसेस सुरु होती. शिक्षक असल्यामुळे त्यांना उन्हाळ्यातचं सुट्टी मिळते मग मुली पाहण्याचा कार्यक्रम ही उन्हाळ्यातच सुरू होता पण आहोच्या आधी मला माझे सासरे पहायला आले, कारण ठरच असं होतं की बाबांना मुलगी आवडली तरच आपण तिला पहायला जायचे, सासऱ्यांनी पाहिल्या नंतर ग्रीन सिग्नल दिला आणि हे आले. सोबत यांचे मामा ही होते, कांदे. पोहे, चहा झाल्यानंतर आला मुली बघण्याचा कार्यक्रम, मी आपली जबरदस्तीने तयार होऊन, डोक्यावर पदर घेऊन, नजर खाली, हळूहळू पावले टाकत आले बसले एकदाची खुर्चीवर आता प्रश्न कोण विचारणार हे मामा भाचा ठरवित होते, शेवटी मामानेच प्रश्न विचारले मी आपली शालिन पणे उत्तरं देत होती मनातून तर असा राग आलेला की काही विचारायलाच नको, पण दाखविणार कुठे? माझी चौकशी झाल्यानंतर मी पळतच रुम मध्ये गेले. मनात असे चालले होते की पसंत नाही असेच उत्तर यायला पाहिजे, म्हणजे आपली सुटका होईल यातून पण कर्म माझे, मुलाकडच्यांनी दिला होकार...... अरे बापरे.. आता काय शिक्षण बंद होणार सगळं इथेच थांबणार होणारा नवरा शिक्षित होता त्यालाही शिक्षणाची आवड होती त्यामुळे त्यांनी आधिच सांगितले आम्ही पुढचे शिक्षण पूर्ण करु हुशशशशशशश....... चला एकतर गोष्ट

मनासारखी घडली त्यानंतर बैठका लग्न कधी करायचे? यावर चर्चा सुरु झाली सासरच्या मंडळीनी लग्न हे दिवाळी नंतरच करायचे सांगितले. माझ्या बाबांनी पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला पण तो सफल झाला नाही लग्नात मानपान कोणी करायचा हे ठरविले, लग्न हे मुलीच्या घरच्यांनी करून द्यावे का तर आम्ही गावात राहत नाही आम्हाला जमणार नाही वगैरे वगैरे

बाबांनी आनंदाने जबाबदारी घेतली कारण आपली मुलगी भविष्यात आंनदी राहील तर आता तडजोड करायला काय हरकत आहे. शेवटी ठरले माझे लग्न आई. बाबा अगदी उत्साहाने तयारी करीत होते, लग्न खरेदी, दागिने, आहेर अशा कितीतरी गोष्टी जमवण्यात मग्न होते, लग्न ठरल्या दिवसापासून मनात धाकधूक होती की निभावेल का आपल्याच्याने हे नाते, त्यामुळे सतत दडपणाखाली असायचे माझी स्थिती अशी होती की सांगता ही येत नाही आणि सहनही होत नाही माझ्या मैत्रिणींना ही माझे लग्न ठरले आहे हे जेव्हा सांगितले तेव्हा त्यांना धक्काचं बसला होता, लग्न जमून ते होई पर्यंत आमचा कसलाच संवाद नव्हता माझ्या लग्नात बरीचशी तयारी ही माझ्या जिवाभावाच्या मैत्रिणींनी केली होती. मेहंदी काढणे, मेकअप करणे, साडी नेसवणे या सगळ्या गोष्टी माझ्या मैत्रिणीने अगदी आनंदाने केल्या. मनामध्ये हे दुःख होते की, आता आम्ही दुरावणार तरीही त्या या सगळ्या गोष्टी आनंदाने करत होत्या. लग्नाचा दिवस उजाडला पाहुण्यांची ये-जा, कामाची लगबग सारं काही सुरू होतं.

 मी आपली शांत बसलेले होते. जेव्हा विधी सुरु झाले, तेव्हा माझे सगळे काम हे यंत्रवत चालू होतं. ज्या सूचना मिळतात त्याला फक्त फॉलो करणे. साखरपुडा व लग्न एकाच दिवशी असल्यामुळे दोन्हीही विधी एकाच दिवशी घेण्यात आले आणि माझ्या लग्नातली गंमत म्हणजे, लग्नात जी नवरा नवरीला हळद लागते ती मी लावलीच नाही. कारण हळदीचे इन्फेक्शन चेहऱ्यावरती होईल त्यामुळे मी स्पष्ट नकार दिला. मला आईने किंवा इतर लोकांनी सुद्धा आग्रह केला नाही. पण माझ्या होणाऱ्या नवऱ्याने मस्त हळद लावून घेतली अजूनही तो विषय कधी-कधी आमच्या घरात निघतो की. 'लग्नात बायकोने हळद लावलीच नाही' मी पण शांत बसत नाही प्रश्नाला कसे उडवून लावायचं ते मला चांगलं जमतं. लग्नात हळदी नंतर अक्षदांची तयारी झाली. त्यासाठी मी तयार होऊन मंडपात आली. नेमकं आपल्याबरोबर काय होतंय हे त्याप्रसंगी समजतच नव्हतं. समोर जे चाललेलं आहे ते स्वीकारणं एवढाच होत होतं.  माझ्या मैत्रिणी माझ्या प्रत्येक लग्नातले विधीला माझ्यासोबत होत्या.

 पण लग्नामध्ये सुद्धा काही अशी लोक असतात जी काहीतरी खुसपट काढणार किंवा काहीतरी लग्नात कमी राहिल आहे. हे सांगण्याचा प्रयत्न करतात. माझ्या लग्नामध्ये ही तेच झालं माझ्या आई-बाबांनी माझ्या संसारासाठी भांडीकुंडी न देता त्यांनी मला सरळ रोख रक्कम दिलेली होती. पण या सासरच्या मंडळीतली एक आगाऊ बाई मंडपभर चर्चा करत होती की, यांनी भांडीच दिलेली नाहीत. तेव्हा माझ्या आईने कडक शब्दात त्यांना उत्तर दिले, की पैसे दिलेले आहेत तेच खर्चुन तुम्हाला हवी तेवढी भांडी घेऊन देते. पण ती घरापर्यंत कशी नेणार तुम्ही, तेव्हा ती थोडी गप्प झाली. लग्न विधिवत पार पडलं, जेवण झाली आणि निघण्याची वेळ आली. लहानपणापासून ज्या घरामध्ये आपण बागडलो तेच घर आता आपण आपल्याला परक होणार ही जाणीवच किंवा हे स्वीकारणच किती अवघड आहे हे त्यावेळी मला समजलं. माझी बहीण माझ्यापेक्षा मोठी पण दोघींचं नातं एकदम घट्ट. तिच्या लग्नामध्ये तर अक्षरशा सगळे विधी होत होते आणि माझं रडणं चालू होतं, का ? तर ती आता आपल्याला सोडून जाणार यासाठी माझ्याही लग्नात असंच काही झालं होतं. सगळ्यांचे निरोप घेऊन आम्ही एका नवीन विश्वात प्रवेश करण्यासाठी पुढच्या प्रवासाला लागलो. लग्नातच जे काही थोडेफार मी माझ्या झालेल्या नवऱ्याबरोबर बोलले,

पण आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये असं समजतं की, आपण प्रेमविवाह करतो त्यापेक्षा ठरवून आई-वडिलांच्या संमतीने केलेले लग्न हेच चांगलं. कारण प्रेमविवाह मध्ये लग्नानंतर दोघांच्या नात्यांमध्ये गोडवा राहीलच असे नाही. पण ठरवून केलेले लग्नामध्ये प्रत्येक क्षण हा नव्याने नाती उलगडत जाणार असतो. प्रत्येक व्यक्ती हा वेळेनुसार नव्याने समजत असतो आणि त्यामुळेच एकमेकांना समजून घेणे तितकच सोपं जातं. एकमेकांविषयी वाटणारे प्रेम जिव्हाळा आदर आपुलकी हे प्रेमविवाहामध्ये कमीच पाहायला मिळेल आपल्याला आणि त्यामुळेच लव मॅरेज पेक्षा कधीही अरेंज मॅरेज सगळ्यात बेस्ट.

थांबते आता कारण लग्नातली गंमत जमती या संपणार नाहीत.

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती