दिल्ली/मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत महायुतीने दमदार कामगिरी करत 17 पैकी 16 जागांवर विजय मिळवला. भाजपने लढवलेल्या सर्व 11 जागा जिंकत शंभर टक्के यश मिळवले. राष्ट्रवादी काँग्रेसनेही दोन्ही जागांवर विजय मिळवला, तर शिवसेनेने 4 पैकी 3 जागा आपल्या नावावर केल्या. उर्वरित एक जागा नाशिकमध्ये अपक्ष आणि भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी जिंकत निवडणुकीतील सर्वात मोठा उलटफेर घडवून आणला.
18 जून रोजी झालेल्या मतदानापूर्वीच 17 पैकी 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले होते. उर्वरित 11 जागांचे निकाल आज जाहीर झाले. महायुतीच्या जागावाटपानुसार भाजपने 11, शिवसेनेने 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 2 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व जागा जिंकल्या, तर शिवसेनेला नाशिकमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.
विधान परिषद निवडणूक : 17 जागांचा निकाल
ठाणे – रवींद्र फाटक (शिवसेना) – बिनविरोध
यवतमाळ – दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना) – बिनविरोध
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस) – बिनविरोध
पुणे – विक्रम काकडे (राष्ट्रवादी काँग्रेस) – बिनविरोध
वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर – अरुण लखाणी (भाजप) – बिनविरोध
अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे (भाजप) – बिनविरोध
छत्रपती संभाजीनगर-जालना – सुहास शिरसाट (भाजप)
नाशिक – गोकुळ गीते (अपक्ष)
भंडारा-गोंदिया – अविनाश ब्राह्मणकर (भाजप)
सांगली-सातारा – धैर्यशील कदम (भाजप)
परभणी-हिंगोली – सईद खान (शिवसेना)
सोलापूर – राजेंद्र राऊत (भाजप)
धाराशिव-लातूर-बीड – बसवराज पाटील (भाजप)
नागपूर – राजीव पोतदार (भाजप)
जळगाव – नंदकिशोर महाजन (भाजप)
अमरावती – प्रवीण पोटे (भाजप)
नांदेड – अमर राजूरकर (भाजप)
नाशिकमध्ये सर्वाधिक चर्चेचा निकाल
नाशिक मतदारसंघातील निकालाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले. महायुतीकडून शिवसेनेचे नरेंद्र दराडे अधिकृत उमेदवार असताना भाजपचे बंडखोर गोकुळ गीते यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. प्रचारातून माघार घेतल्याची घोषणा करूनही त्यांनी अर्ज कायम ठेवला आणि अखेर अधिकृत उमेदवारालाच पराभूत करत विजय मिळवला. या निकालामुळे शिवसेनेच्या खात्यातील एक जागा हातातून गेली, तर गोकुळ गीते यांच्या समर्थकांनी विजयाचा जल्लोष साजरा केला.