पुणे : दुर्गाष्टमीच्या पावन निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरात सामाजिक बांधिलकी जपत रक्ताचे नाते ट्रस्टच्या वतीने अपंग रुग्णास व्हीलचेअर प्रदान करण्यात आली. रक्तदान शिबिर समन्वयक श्रीराम बांगड यांनी दर महिन्याच्या दुर्गाष्टमीला गरजू व अपंग रुग्णांची भेट घेऊन त्यांना मदतीचा हात देण्याचा संकल्प केला असून, त्याच संकल्पाचा भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला.
आज शंकर महाराज मठ, पुणे येथे आयोजित रक्तदान शिबिरात श्री नारायण बांडे या अपंग रुग्णाला त्यांच्या चिरंजीवांच्या उपस्थितीत व्हीलचेअर भेट देण्यात आली. या मदतीमुळे रुग्णाच्या दैनंदिन हालचाली अधिक सुलभ होणार असून त्यांच्या कुटुंबीयांनी रक्ताचे नाते ट्रस्टचे आभार मानले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी रक्तदानासोबतच समाजातील गरजू, दिव्यांग आणि रुग्णांना मदतीचा हात देणारे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याची गरज व्यक्त केली. तसेच रक्ताचे नाते ट्रस्टच्या कार्याचे कौतुक करून अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजात संवेदनशीलता आणि परस्पर सहकार्याची भावना वृद्धिंगत होत असल्याचे सांगितले.
श्रीराम बांगड यांनी यापुढेही प्रत्येक दुर्गाष्टमीला गरजू अपंग रुग्णांना भेट देऊन त्यांच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला. रक्तदानासारख्या जीवनदायी कार्याबरोबरच सामाजिक सेवेला प्राधान्य देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.
या प्रसंगी रक्तदाते, स्वयंसेवक, ट्रस्टचे पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्तदान शिबिरासह गरजू रुग्णाला व्हीलचेअर प्रदान करण्याचा हा उपक्रम सामाजिक जाणीव आणि मानवसेवेचे उत्कृष्ट उदाहरण ठरला.