पुणे : देशभरात चर्चेत राहिलेल्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) रविवारी पुणे शहर आणि जिल्ह्यात कोणत्याही अडथळ्याशिवाय शांततेत पार पडली. जिल्ह्यातील ३६ आणि पुणे शहरातील २७ अशा एकूण ६३ परीक्षा केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्थेत परीक्षा घेण्यात आली. परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने व्यापक बंदोबस्त ठेवला होता.
परीक्षार्थींना दुपारी १.३० वाजेपर्यंत केंद्रांमध्ये प्रवेश देण्यात आला. विद्यार्थ्यांसोबत मोठ्या संख्येने पालकही केंद्राबाहेर उपस्थित होते. प्रत्येक परीक्षा केंद्रावर सुमारे २० पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि पोलिस उपायुक्तांनी विविध केंद्रांना भेट देत सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.
परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी सर्व केंद्रांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून सातत्याने देखरेख ठेवण्यात आली. तसेच संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आले. पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने सोशल मीडियावर विशेष लक्ष ठेवले होते.
विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यापूर्वी आधार-आधारित बायोमेट्रिक पडताळणी, फेस ऑथेंटिकेशन आणि दुहेरी सुरक्षा तपासणी करण्यात आली. केंद्रांवर जॅमर यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आली होती. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनीही विशेष नियोजन केले होते.
पिंपरी-चिंचवडमध्येही परीक्षा सुरळीत
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध परीक्षा केंद्रांवरही ‘नीट’ परीक्षा कोणत्याही अडचणीशिवाय पार पडली. अनेक विद्यार्थी वेळेआधीच केंद्रांवर पोहोचले होते. प्रवेशपत्र, ओळखपत्र आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी करूनच विद्यार्थ्यांना केंद्रात प्रवेश देण्यात आला. प्रभावी सुरक्षा व्यवस्था आणि नियोजनामुळे संपूर्ण परीक्षा शांततेत आणि सुरळीत पार पडल्याचे प्रशासनाने सांगितले.