सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सचिन अहिर यांची विधानपरिषद उपसभापतीपदी बिनविरोध निवड; फडणवीसांनी सांगितला 'अहिर' शब्दाचा अर्थ, शिंदेंकडून शायरीत शुभेच्छा
  • श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांच्या केंद्रीय मंत्रिपदाची जोरदार चर्चा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच दिल्ली गाठण्याची शक्यता
  • मुंबई-ठाणे-पालघरला दुपारी ४ पर्यंत रेड अलर्ट; पुण्याच्या घाटमाथ्यावरही अतिमुसळधार पावसाचा इशारा
  • मोठी बातमी: व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात, 183 रुपयांची घसघशीत कपात
 DIGITAL PUNE NEWS

'देऊळ बंद 2'ची 100 कोटींकडे दमदार वाटचाल; 93.50 कोटींच्या कमाईनंतर ऐतिहासिक टप्पा अवघ्या काही पावलांवर

डिजीटल पुणे    23-06-2026 13:25:59

पुणे : दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे यांचा 'देऊळ बंद 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशाची घोडदौड कायम ठेवत आहे. प्रदर्शित होऊन महिन्याहून अधिक कालावधी उलटूनही प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी झालेला नाही. त्यामुळे हा चित्रपट आता 100 कोटी रुपयांच्या ऐतिहासिक कमाईच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.

सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने प्रदर्शनाच्या 33 दिवसांत जगभरातून 84.76 कोटी रुपयांची कमाई केली असून 100 कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सुमारे 15 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. या कामगिरीमुळे 'देऊळ बंद 2' हा मराठीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

दरम्यान, प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत चित्रपटाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने केवळ 32 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 88.20 कोटी रुपयांची कमाई केली आहे. याशिवाय परदेशातील प्रदर्शनातून 4.20 कोटी आणि तंबू शोमधून 1.10 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून चित्रपटाची एकूण कमाई 93.50 कोटी रुपयांवर पोहोचल्याचा दावा त्यांनी केला आहे.

आपल्या पोस्टमध्ये प्रवीण तरडे यांनी मराठी चित्रपटसृष्टीच्या वाढत्या यशाचा उल्लेख करत, "मराठी सिनेमा मोठा होत आहे. लवकरच मराठी सिनेमाचे तिसरे शतक साजरे करू," अशी भावना व्यक्त केली. तसेच 'देऊळ बंद 2'ला देश-विदेशात प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सुमारे 9 ते 10 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने भारतात आतापर्यंत 72.24 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. देशभरातील 41 हजारांहून अधिक शोमधून चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली आहे. त्यामुळे 2026 मधील सर्वाधिक नफा कमावणाऱ्या मराठी चित्रपटांमध्येही त्याने स्थान मिळवले आहे.

'देऊळ बंद 2' हा 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'देऊळ बंद'चा सिक्वेल आहे. पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने चित्रपटाची यशस्वी घोडदौड अद्यापही कायम आहे. आता हा चित्रपट 100 कोटींचा टप्पा कधी पार करतो, याकडे मराठी चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती