सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • 'फेकनाथ मिंधे उत्तर द्यायला घाबरतात', आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात; विधानसभेत आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापलं
 DIGITAL PUNE NEWS

'फेकनाथ मिंधे उत्तर द्यायला घाबरतात', आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात; विधानसभेत आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापलं

डिजीटल पुणे    23-06-2026 14:58:06

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा जोरदार शाब्दिक चकमक रंगली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विभागांशी संबंधित प्रश्नांना इतर मंत्र्यांकडून उत्तरे दिली जात असल्याच्या मुद्द्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेत सभागृहातून सभात्याग केला.

यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आमदार आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. स्वतःच्या खात्याविषयी उत्तर देण्याऐवजी इतर मंत्र्यांवर जबाबदारी सोपवली जात असल्याचा आरोप करत त्यांनी, "फेकनाथ मिंधे उत्तर द्यायला घाबरतात आणि पळून जातात," अशी टीका केली. तसेच, त्यांच्या सरकारच्या काळात कोणत्याही मंत्र्याने अशा प्रकारे जबाबदारी टाळली नव्हती, असा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजाच्या पद्धतीवर आक्षेप घेत इंग्रजी शब्दांच्या वापराबाबत नाराजी व्यक्त केली. सभागृहाचे कामकाज निष्पक्षपणे चालवले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.

विरोधकांच्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहातच प्रत्युत्तर दिले. विरोधकांचा समाचार घेत त्यांनी, "कालच्या धक्क्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. पुढे आणखी धक्के देणार आहोत," असा टोला लगावला. तसेच विरोधी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी "पोराटोरांचे ऐकू नये," असे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही अप्रत्यक्ष निशाणा साधला.या आरोप-प्रत्यारोपांमुळे विधानसभेतील वातावरण काही काळ चांगलेच तापले असून, अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांतील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती