सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • 'फेकनाथ मिंधे उत्तर द्यायला घाबरतात', आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात; विधानसभेत आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापलं
 जिल्हा

मुंबईच्या जोगेश्वरीत चार कथित साधूंना नागरिकांची मारहाण; संशयास्पद हालचालींच्या संशयावरून पोलिसांच्या ताब्यात

डिजीटल पुणे    23-06-2026 17:04:18

मुंबई : मुंबईतील जोगेश्वरी पूर्व येथील दुर्गा नगर परिसरात चार कथित साधूंना स्थानिक नागरिकांनी पकडून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून हे चौघे अंधेरी-जोगेश्वरी परिसरात संशयास्पदरीत्या फिरत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता. त्यानंतर संतप्त नागरिकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

स्थानिकांच्या माहितीनुसार, मागील चार दिवसांपासून या व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या. परिसरात मुलांचे अपहरण करण्यासाठी काही जण फिरत असल्याच्या चर्चांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याच संशयातून नागरिकांनी चौघांना घेराव घालत मारहाण केली आणि त्यानंतर एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि संबंधित चारही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या ओळखीची पडताळणी तसेच ते परिसरात का फिरत होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. अद्याप त्यांच्याविरोधात कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नसून चौकशीनंतरच संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, या घटनेमुळे 2020 मधील पालघर साधू हत्याकांडाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मात्र, पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून संशयास्पद व्यक्ती आढळल्यास कायदा हातात न घेता तात्काळ पोलिसांना माहिती देण्यास सांगितले आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती