बुलढाणा : समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीडजवळ सोमवारी झालेल्या भीषण अपघातात छत्रपती संभाजीनगर येथील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत कारमधील दोन लहान मुले आणि चालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. सय्यद आसिफ सय्यद उमर हे पत्नी गुलसितान बी, दोन मुलं आणि चालकासह नागपूरहून छत्रपती संभाजीनगरकडे फॉर्च्यूनर कारने प्रवास करत होते. दुसरबीड परिसरात भरधाव वेगातील कारने समोरून जात असलेल्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, डॉ. सय्यद आसिफ आणि त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू करत जखमी चालक व दोन चिमुकल्यांना बाहेर काढले. त्यांना प्राथमिक उपचारानंतर जालना येथील रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
या अपघातामुळे काही काळ समृद्धी महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अपघाताचे नेमके कारण शोधण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, भरधाव वेग आणि वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.