मुंबई : आदिवासी भागात कार्यरत असलेल्या आशा सेविका आणि आरोग्य कर्मचारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महत्वपूर्ण सेवा देत आहेत. आशा सेविकांना मोबाईल फोन आणि इतर दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. ही सुविधा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या (एनएचएम) प्रस्तावात समाविष्ट करण्यात येणार असून राज्य शासनाकडूनही आवश्यक तरतूद केली जाईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर दिली.
सदस्य चित्रा वाघ यांनी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगाव या अतिदुर्गम आदिवासी भागातील आशा सेविकांच्या समस्या, आरोग्य सुविधा आणि कर्मचारी वर्गाच्या अडचणींबाबत विधान परिषदेत नियम ९२ अन्वये अर्धा तास चर्चेत मुद्दे मांडले. यावेळी सदस्य उमा खापरे यांनीही आदिवासी भागातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याबाबत सूचना मांडल्या.
सार्वजनिक आरोग्य मंत्री मंत्री आबिटकर म्हणाले की, अतिदुर्गम भागातील रुग्णवाहिका सेवांचा प्रश्न लक्षात घेऊन अक्कलकुवा व धडगाव परिसरात अतिरिक्त रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यासाठी आवश्यक मनुष्यबळाचीही व्यवस्था करण्यात येईल. यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीचाही उपयोग करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जननी सुरक्षा योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक सहाय्यात वाढ करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. आशा सेविकांना आवश्यक असलेले वजनकाटे, थर्मामीटर आणि इतर साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल. याचबरोबर आशा सेविकांना देण्यात येणाऱ्या साडी भत्त्यात वाढ करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून सध्या ६०० रुपयांऐवजी १,२०० रुपये देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती मंत्री आबिटकर यांनी दिली.
राज्यात लवकरच १,४०० नवीन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार असून दुर्गम भागात कार्यरत डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था उभारण्यास प्राधान्य दिले जाईल. यासाठी शासन निधीबरोबरच सीएसआरचा वापर करण्याचाही विचार असल्याचे त्यांनी नमूद केले.
नंदुरबार जिल्ह्यातील सिकलसेल प्रतिबंध व निदान मोहिमेचा उल्लेख करताना मंत्री आबिटकर यांनी सांगितले की, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली असून लाखो नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईही करण्यात आली आहे.
आदिवासी भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध असून आशा सेविका, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे मंत्री आबिटकर यांनी यावेळी सांगितले.