पुणे : राज्यभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवले आहे. या खटल्यातील शिक्षेचा निर्णय आता 29 जून रोजी सुनावला जाणार असून संपूर्ण राज्याचे लक्ष त्या निकालाकडे लागले आहे.
पुणे जिल्ह्यातील नसरापूर गावात साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात आली. अखेर विशेष न्यायालयाने आरोपीविरोधातील पुरावे ग्राह्य धरत त्याला दोषी घोषित केले.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपीला अंतिम म्हणणे मांडण्याची संधी दिली. त्यावेळी भीमराव कांबळे याने स्वतःवरील आरोप पुन्हा नाकारले. संबंधित दिवशी मुलीला खाऊ देण्यासाठी घेऊन गेलो असताना अपघाताने ती जखमी झाल्याचा दावा त्याने केला. मात्र न्यायालयाने त्याचा बचाव फेटाळून लावत गुन्हा सिद्ध झाल्याचे स्पष्ट केले.
सरकारी पक्षाने आरोपीविरोधातील परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि तपासातील निष्कर्षांचा आधार घेत कठोर शिक्षेची मागणी केली. आरोपीचा पूर्वीचा गुन्हेगारी इतिहास लक्षात घेता तो समाजासाठी धोकादायक असून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.
दुसरीकडे बचाव पक्षाने आरोपीचे वय आणि प्रकरणातील काही मुद्द्यांवर आक्षेप घेत जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी केली. मात्र अंतिम शिक्षेबाबतचा निर्णय न्यायालय 29 जून रोजी जाहीर करणार आहे.
जलदगतीने चालवण्यात आलेल्या या खटल्याचा निकाल राज्यातील महत्त्वाच्या न्यायालयीन निर्णयांपैकी एक मानला जात आहे. आता दोषी ठरलेल्या 65 वर्षीय भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा होते की जन्मठेप, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.