उरण : प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या विविध सामाजिक संस्था संघटना कार्यरत आहेत.जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी व परिसरातील समाज बांधवांच्या विकासासाठी या विविध सामाजिक संस्था संघटना झटत असतात. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध समाज बांधव, नागरिकांची एक सामाजिक संस्था असावी या दृष्टीकोणातून रत्नागिरीकर सामाजिक प्रतिष्ठान करंजाडे पनवेल या संस्थेची स्थापना झाली असून रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत या संघटनेत मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन या संघटनेतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना अर्थातच रत्नागिरीकरांना केले आहे.
दि. ९ मार्च २०२६ रोजी सामाजिक कार्यकर्ते योगेश रमेश आगरे, करंजाडे सेक्टर ६, यांनी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गुजर, सेक्टर ४, यांच्याकडे संकल्पना मांडली कि, आपल्या पनवेल तालुक्यातील करंजाडे शहरामध्ये सर्व जिल्ह्यातील सामाजिक संस्था कार्यरत आहेत. तर आपल्या रत्नागिरी जिल्ह्याची सामाजिक संस्था का असू नये! आणि इथूनच या दोघांच्या डोक्यात चक्र फिरू लागली. त्यानंतर प्रत्येक इमारती मध्ये जशी ओळख असेल त्याप्रमाणे त्यांनी रत्नागिरीकर बांधव शोधण्यास सुरुवात झाली. यातूनच दिनेश धामणस्कर, प्रशांत भेकरे, संजय चाळके, नेहा मोरे, समीक्षा भायजे, आणि रमेश आगरे अशी जवळपास ४० उत्सुक मंडळी लाभली. दि. १० मार्च २०२६ रोजी एक बैठक घेऊन पुढील दिशा ठरविण्यात आली. आणि बघता बघता १०९ बांधव जमा झाले. पुढे काय ? असा सवाल उपस्थित झाला.
यावेळी पुढे काय करायचे याबाबत सर्वांनी एकमुखी निर्णय घेतला.सर्वांनी या संस्थेचा उद्देश ठरविले.रत्नागिरी तसेच करंजाडे मधील रत्नागिरी बांधवांच्या मुलांना जे चांगल्या मार्काने उत्तीर्ण होणारे विद्यार्थी आहेत त्यांचा यथोचित सत्कार करून भावी आयुष्यास प्रोत्साहन देणे. महिला वर्गाचे बचत गट तयार करणे, ग्रामीण उत्पादनांना प्रोत्साहन देणे. वधूवर सूचक समिती नेमणे. जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने गर्भसंस्कार कार्यक्रम घेणे. पावसाळ्यात वृक्षारोपण करणे. करंजाडेत कोणी व्यवसाय करत असेल त्याला प्रोत्साहन देणे. दिवाळी पहाट ऐवजी दिवाळी संध्या कार्यक्रम घेणे. ग्रामीण सांस्कृतिक कलांना प्रोत्साहन देणे. उदा. जाखडी, नमन, गणपती शिमग्याला पनवेल एस.टी. डेपोतून बस सोडणे. अशा विविध उद्दिष्ट संस्थेचे ठरविण्यात आले.तसेच रत्नागिरीकर बांधवांच्या सुखः दुखाला धावून जाण्यास अग्रक्रम देणे हे सुद्धा उद्देश संस्थेचे ठरविण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गुजर यांनी तसेच सर्व पदाधिकारी सदस्यांनी आवाहन केले की बांधवांनो, आपण करंजाडेत संख्येने कमी असलो तरी आपल्यातील गुणवत्तेच्या जोरावर सर्वांनी एकत्र येऊन आपल्या विचारांची मोठ बांधली तर, आपण योजिलेले अनेक उद्धेश तडीस नेऊ शकतो यात शंका नाही. त्याकरिता केवळ मनाचा निश्चय करणे गरजेचे आहे आणि तो फक्त आपल्या निर्णयाच्या एका क्लिकवर अवलंबून आहे. तर, चला आपले रत्नागिरीकर बांधव करंजाडेत कोठे आहेत ते शोधूया आणि त्यांना ह्या प्रवाहात आणूया असे आवाहन आम्ही रत्नागिरीकर संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत महादेव गुजर,उपाध्यक्ष रमेश गोपाळ आगरे, कार्याध्यक्ष संजय चाळके,सचिव दिनेश गणपत धामणस्कर सचिव, खजिनदार योगेश रमेश आगरे,सहसचिव प्रशांत पांडुरंग भेकरे,सदस्य नेहा सुधाकर मोरे यांनी केले आहे.जे कोणी रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक करंजाडे परिसरात आहेत त्यांनी या संस्थेचे पदाधिकारी सदस्य यांच्याशी संपर्क साधावा व संस्थेच्या विविध उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
अधिक माहिती व सदस्य बनण्यासाठी दिनेश धामणस्कर 88280 93020, प्रशांत भेकरे 95949 84209, रमेश आगरे 79772 39703 यांच्याशी संपर्क साधावे.