सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : जातीवरुन वाद, खासदार मेधा कुलकर्णींच्या डोळ्यात पाणी; म्हणाल्या, अभिमन्यू पवार स्वतःला Superior समजतात
  • लोहगड केतन अग्रवाल प्रकरणात उज्ज्वल निकमांची एंट्री; सिया-चेतनच्या अडचणीत वाढ, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
  • मान्सून पुन्हा सक्रिय! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; कोकण, मराठवाडा, विदर्भासह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
 शहर

धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाचे पावसाळापूर्वीचे नियोजन शून्य; नागरिकांच्या जीविताशी खेळ सुरू असल्याचा आरोप

डिजीटल पुणे    26-06-2026 15:01:09

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत पावसाळा सुरू होताच अनेक ठिकाणी पाणी साचणे, नाले तुंबणे, वाहतूक कोंडी, भूस्खलनाचा धोका आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते प्रशांत प्रकाश कांबळे यांनी धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सुमारे चार महिन्यांपूर्वी झालेल्या मोहल्ला मिटिंगमध्ये पावसाळ्यापूर्वी करावयाच्या विविध उपाययोजनांबाबत अनेक प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. राष्ट्रीय महामार्गालगत असलेला साईड रोड नागरिकांसाठी खुला करण्यात यावा, नाले व पर्जन्यजल वाहिन्यांची तातडीने साफसफाई करण्यात यावी, शनीनगर चौक परिसरातील पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, तसेच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा अनेक सूचना प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. मात्र या सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.

आजही संबंधित ठिकाणी मातीचे ढिगारे पडून असून अनेक नाले व पर्जन्यजल वाहिन्या गाळ आणि मातीने भरलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे थोड्याशा पावसातही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. याचा थेट परिणाम वाहतुकीवर होत असून नागरिकांसह पोलीस प्रशासनालाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

दत्तनगर चौक, भुमकर चौक, कात्रज परिसर, भारती विद्यापीठ चौक तसेच शनीनगर चौक हे परिसर आधीच वाहतूक कोंडीसाठी संवेदनशील आहेत. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक बिकट होत असून साचलेल्या पाण्यातून वाहने संथ गतीने मार्गक्रमण करत असल्याने वाहतूक कोंडी वाढत आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व आवश्यक कामे पूर्ण होणे अपेक्षित असताना प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांना त्याचा फटका बसत आहे.

याशिवाय, सच्चाई माता परिसरातील अटल ११ परिसरात यापूर्वी मोठी दुर्घटना घडली होती. भूस्खलनाची गंभीर घटना घडूनही त्या ठिकाणी अद्याप आवश्यक संरक्षणात्मक किंवा दुरुस्तीची कामे सुरू झालेली नाहीत. भविष्यात आणखी मोठी दुर्घटना घडू नये यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असताना प्रशासनाची भूमिका अत्यंत सुस्त आणि निष्क्रिय असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

विविध विकासकामे, रस्ते, नालेसफाई आणि पावसाळापूर्व उपाययोजनांवर लाखो रुपये खर्च करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात नागरिकांना त्याचा कोणताही ठोस फायदा झालेला दिसत नाही. उलट अपूर्ण कामे, निकृष्ट नियोजन, मातीचे ढिगारे, तुंबलेले नाले आणि वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांचे आर्थिक, शारीरिक आणि मानसिक नुकसान होत असल्याचे चित्र आहे.

नागरिकांना सुविधा देण्याऐवजी त्यांना त्रास होईल अशीच परिस्थिती निर्माण करण्यात आल्याची भावना जनतेमध्ये वाढत आहे. लाखो रुपयांचे वेतन आणि विविध शासकीय सुविधा मिळत असतानाही काही अधिकारी नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी केला आहे. खर्च झालेल्या निधीचा तपशील, करण्यात आलेल्या कामांची गुणवत्ता आणि त्यातून नागरिकांना झालेला प्रत्यक्ष फायदा याबाबत प्रशासनाने सार्वजनिक खुलासा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

सर्वात गंभीर बाब म्हणजे, वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने सामान्य नागरिकांनी न्याय कोणाकडे मागावा, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. लोकशाही व्यवस्थेत नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर तातडीने कार्यवाही होणे अपेक्षित असते. मात्र सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचा सन्मान राखत प्रशासनाने जनतेप्रती उत्तरदायित्व दाखविणे आवश्यक आहे.

धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाने तातडीने नालेसफाई, मातीचे ढिगारे हटविणे, बंद असलेले साईड रोड नागरिकांसाठी खुले करणे, भूस्खलनग्रस्त भागात संरक्षणात्मक उपाययोजना करणे आणि पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा. अन्यथा नागरिकांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत प्रकाश कांबळे यांनी दिला आहे.


 Give Feedback



 जाहिराती