तिरुपती / विजयवाडा (आंध्र प्रदेश) : राज्यातील राजकीय घडामोडी आणि संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग आला असतानाच शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. दोघांनी तिरुपतीहून तिरुमला मंदिरापर्यंतचा सुमारे ११ किलोमीटरचा डोंगरमार्ग पायी पार करत मध्यरात्रीच्या सुमारास श्री वेंकटेश्वरांचे दर्शन घेतले.
माहितीनुसार, २५ जून रोजी रात्री सुमारे १० वाजता सुरू झालेल्या या पदयात्रेत त्यांनी जवळपास ३,८०० पायऱ्या चढत पहाटे मंदिरात दर्शन घेतले. पैलवान चंद्रहार पाटील यांनी सोशल मीडियावर यासंदर्भातील माहिती आणि छायाचित्रे शेअर केली आहेत.या प्रवासात श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत खासदार श्रीरंग बारणे, ॲड. निलेश देशमुख, चंद्रहार पाटील आणि ओमराजे यांचे बंधू देखील सहभागी झाले होते.या व्हीआयपी देवदर्शनासाठी सर्व खासदारांनी मुंबई, पुणे, तिरुपती आणि विजयवाडा असा विमानाने आणि रस्ते मार्गाने प्रवास केला.ठाकरेंच्या शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेल्या 6 खासदारांपैकी ओमराजे निंबाळकर यांना मतदार आणि सोशल मीडियावर मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते;

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यामध्ये डॉ. श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या या धार्मिक दौऱ्याची राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा रंगली आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
तिरुपती बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर शिष्टमंडळाने विजयवाडा येथील कन्यका परमेश्वरी देवीचेही दर्शन घेतले. या दौऱ्यात खासदार श्रीरंग बारणे, ॲड. निलेश देशमुख, पैलवान चंद्रहार पाटील तसेच ओमराजे निंबाळकर यांचे बंधू सहभागी झाले होते.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून बाहेर पडून शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर ओमराजे निंबाळकर यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. मात्र, विकासाच्या उद्देशानेच हा निर्णय घेतल्याचा पुनरुच्चार त्यांनी वेळोवेळी केला आहे. आता संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे यांच्यासोबत केलेल्या या तिरुपती दौऱ्यामुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे.
