सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • टीईटी पेपर फुटी प्रकरण! मंत्री दादा भुसेंनी राजीनामा द्यावा, शिक्षक आमदार जयंत आंसगावकरांची मागणी
  • मोठी बातमी: महाराष्ट्रात पुन्हा पेपरफुटीचे सत्र! उद्या होणारी 'टीईटी' परीक्षा रद्द; ठाण्यातून पेपर जप्त, पोलीस ॲक्शन मोडमध्ये
  • टीईटीचा पेपर फुटला, परीक्षा रद्द; पहिले NEET, आता TET, महाराष्ट्र पुन्हा हादरला
  • सख्ख्या भावाचाही सियाविरोधात जबाब; 'केतनशी लग्न नको' असं कधीच सांगितलं नव्हतं, तपासाला नवं वळण
 क्राईम

मोहरम मिरवणुकीत 'पेन किलर'च्या नावाखाली विषारी कॅप्सूल वाटप; एकाची प्रकृती गंभीर, १४ हजारांहून अधिक कॅप्सूल जप्त

डिजीटल पुणे    27-06-2026 17:44:24

मुंबई  : मुंबईतील भायखळा परिसरात मोहरम मिरवणुकीदरम्यान अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मिरवणुकीत सहभागी नागरिकांना वेदनाशामक औषध असल्याचे सांगून विषारी कॅप्सूल वाटण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या कॅप्सूलचे सेवन केल्यानंतर काही जणांना उलट्या व तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला असून, एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून सुमारे १४,९०० विषारी कॅप्सूल आणि मोठ्या प्रमाणात झिंक फॉस्फाईड जप्त केले आहे.

तपासादरम्यान आरोपीने ऑनलाईन माध्यमातून मोठ्या प्रमाणात रिकाम्या कॅप्सूल आणि झिंक फॉस्फाईड हे उंदीर मारण्यासाठी वापरले जाणारे विषारी रसायन मागवल्याचे समोर आले. प्रत्येक कॅप्सूलमध्ये सुमारे एक ग्रॅम झिंक फॉस्फाईड भरून त्या तयार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कॅप्सूल नागरिकांना 'पेन किलर' म्हणून दिल्या जात होत्या.

मिरवणुकीतील काही नागरिकांची प्रकृती अचानक बिघडल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर हजारो तयार कॅप्सूल तसेच सुमारे ५० किलो झिंक फॉस्फाईड जप्त करण्यात आले.

या प्रकरणातील आरोपीची ओळख फैयाज प्रेमजी (वय ३९) अशी असून तो मूळचा पुण्यातील विमाननगर परिसरातील रहिवासी आहे. प्राथमिक चौकशीत त्याने स्वतः या विषारी कॅप्सूल तयार केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस उपायुक्त जयंत मीना यांनी सांगितले की, पोलिसांच्या वेळेवर केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला. इतक्या मोठ्या प्रमाणातील विषारी कॅप्सूल लोकांपर्यंत पोहोचल्या असत्या, तर गंभीर जीवितहानी होण्याची शक्यता होती.

दरम्यान, आरोपीने एवढ्या मोठ्या प्रमाणात विषारी कॅप्सूल का तयार केल्या, त्यामागे नेमका हेतू काय होता, तसेच या प्रकरणाचा कोणत्याही संघटित गुन्हेगारी किंवा इतर गंभीर कटाशी संबंध आहे का, याचा सर्वंकष तपास सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीने २०२५ मध्ये इराण आणि इराकचा दौरा केल्याची माहितीही तपासात समोर आली असून, या पार्श्वभूमीवर विविध तपास यंत्रणांच्या मदतीने प्रकरणाची चौकशी केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती