सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना; शाळकरी मुलांच्या बसवर झाड कोसळलं, 10 मुले गंभीर जखमी, एक मुलगा अडकल्याची भीती
  • एकनाथ शिंदेंची एक ऑफर आणि ठाकरेंचा विश्वासू आमदार सचिन अहिर थेट शिंदे गटात पक्षप्रवेश केला.
  • सचिन अहिर शिंदे गटात जाताच चंद्रशेखर बावनकुळेंनी ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाले, 'अहंकारामुळे पक्ष लयाला गेला'
 जिल्हा

नसरापूर प्रकरणातील दोषीला फाशी; केतन अग्रवाल प्रकरणही फास्टट्रॅकवर चालवणार : एकनाथ शिंदे

डिजिटल पुणे    29-06-2026 15:31:45

पुणे : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी विशेष न्यायालयाने दोषी भीमराव प्रभाकर कांबळे (वय 65) याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. आरोपीने केलेला गुन्हा हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि 'दुर्मीळातील दुर्मीळ' स्वरूपाचा असल्याचे न्यायालयाने नमूद केले. अवघ्या 58 दिवसांत या खटल्याचा निकाल लागल्याने राज्याच्या न्यायव्यवस्थेच्या इतिहासात ही महत्त्वाची नोंद ठरली आहे.

या निर्णयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यायालय, तपास यंत्रणा, पोलीस अधिकारी आणि सरकारी वकिलांचे अभिनंदन करत हा निकाल समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर कठोर संदेश देणारा असल्याचे सांगितले.

शिंदे म्हणाले की, या प्रकरणात पोलिसांनी अल्पावधीत तपास पूर्ण करून ठोस पुराव्यांसह आरोपपत्र दाखल केले. त्यामुळे न्यायालयाने वेगाने सुनावणी पूर्ण करत दोषीला फाशीची शिक्षा सुनावली. अशा कठोर शिक्षेमुळे महिलांवरील अत्याचार आणि बालकांविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याचवेळी शिंदे यांनी केतन अग्रवाल प्रकरणाचाही उल्लेख केला. नियोजित हत्या, बलात्कार किंवा अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांचीही फास्टट्रॅक न्यायालयात जलद सुनावणी करून लवकरात लवकर निकाल लावण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना, महिलांवरील आणि बालकांवरील अत्याचारांना समाजात कोणतेही स्थान नसल्याचे स्पष्ट केले. महिलांची आणि मुलींची सुरक्षितता ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असून अशा अमानुष गुन्ह्यांविरोधात कठोर कारवाईची भूमिका कायम राहील, असे त्यांनी नमूद केले.

नसरापूर प्रकरणातील न्यायालयाचा निर्णय हा न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करणारा असून, भविष्यात अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाईचा स्पष्ट संदेश देणारा ठरल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. :::


 Give Feedback



 जाहिराती