सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना; शाळकरी मुलांच्या बसवर झाड कोसळलं, 10 मुले गंभीर जखमी, एक मुलगा अडकल्याची भीती
  • एकनाथ शिंदेंची एक ऑफर आणि ठाकरेंचा विश्वासू आमदार सचिन अहिर थेट शिंदे गटात पक्षप्रवेश केला.
  • सचिन अहिर शिंदे गटात जाताच चंद्रशेखर बावनकुळेंनी ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाले, 'अहंकारामुळे पक्ष लयाला गेला'
 जिल्हा

राज्यात पावसाळी मासेमारी बंदी १५ ऑगस्टपर्यंत – मंत्री नितेश राणे

डिजीटल पुणे    29-06-2026 16:15:54

मुंबई : राज्यातील मत्स्यसाठ्याचे संवर्धन, माशांना प्रजननासाठी अधिक कालावधी उपलब्ध करून देणे, तसेच पावसाळ्यातील खराब हवामानामुळे मच्छीमारांची जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी राज्य शासनाने पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी वाढवून १५ ऑगस्टपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली.

यापूर्वी राज्याच्या जलधी क्षेत्रात १ जून ते ३१ जुलै या ६१ दिवसांच्या कालावधीत यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौकांना बंदी होती. पश्चिम मान्सूनचे आगमन, मत्स्यसाठ्याचे संरक्षण आणि मच्छीमारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा कालावधी निश्चित करण्यात आला होता. मात्र, मासेमारी हंगामाच्या सुरुवातीला लहान माशांची होणारी मासेमारी रोखण्यासाठी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढवावा, अशी मागणी विविध मच्छीमार सहकारी संस्थांकडून शासनाकडे करण्यात आली होती. या मागणीच्या अनुषंगाने जिल्हा समिती तसेच राज्य सल्लागार व सनियंत्रण समितीचे अहवाल मागविण्यात आले. या समित्यांनीही बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा अभिप्राय दिला.

शासनाच्या मते, वाढीव बंदीमुळे मत्स्यसाठ्याचे जतन व संवर्धन होण्यास मदत होईल. तसेच माशांना प्रजननासाठी पुरेसा कालावधी मिळेल आणि भविष्यातील पिढ्यांसाठी मत्स्यसंपदा टिकवून ठेवणे शक्य होईल. याशिवाय पावसाळ्याच्या सुरुवातीला येणारे वादळी वारे, चक्रीवादळे, अवकाळी पाऊस आणि खराब हवामानामुळे होणारी संभाव्य जीवित व वित्तहानीही टाळता येणार आहे.

दरम्यान, राज्यात बंदी लागू असताना इतर राज्यांतील मासेमारी नौका महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर येऊन अनधिकृत मासेमारी करत असल्यास त्यांच्याविरुद्ध मत्स्य विभागाकडून कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री राणे यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे.


 Give Feedback



 जाहिराती