पुणे : नसरापूर येथे घडलेली घटना अत्यंत संतापजनक आणि घृणास्पद होती. एका चिमुरडीवर अत्याचार आणि तिचं आयुष्य संपुष्टात आल्यानं देशभर शोक-संतापाची लाटच उसळली होती.भीमराव कांबळे नावाच्या आरोपीचा हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मीळ मानून पुणे सत्र न्यायालयाने त्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. या निर्णयाचं स्वागत.
या प्रकाराची मा. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली होती. वेगाने तपास करा आणि तपासात कुठलीही त्रुटी राहणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. यंत्रणांनीही माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या गुन्ह्याचा तपास शर्थीनं केला. कुठलाही कच्चा दुवा, पळवाट काढता येणार नाही, अशा प्रकारचा तपास आणि भक्कम पुराव्यांमुळे न्यायालयात गुन्हा सिद्ध झाला आणि आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा झाली.
एक माणूस म्हणून प्रत्येकालाच या निकालाचा निश्चितच आनंद झाला असेल.या निकालातून, असे गुन्हे करणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही, त्यांना गुन्ह्याची सजा तातडीने मिळेल, असा इशाराच महायुती सरकारनं दिला आहे.या गुन्ह्याचा काटेकोर तपास करून आरोपीला फाशीचीच शिक्षा होईल, अशा प्रकारे तपास करणारे आमचे पोलिस, तपासात सहभागी अन्य यंत्रणांचे आणि माननीय न्याययंत्रणेचेही आभार!