सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना; शाळकरी मुलांच्या बसवर झाड कोसळलं, 10 मुले गंभीर जखमी, एक मुलगा अडकल्याची भीती
  • एकनाथ शिंदेंची एक ऑफर आणि ठाकरेंचा विश्वासू आमदार सचिन अहिर थेट शिंदे गटात पक्षप्रवेश केला.
  • सचिन अहिर शिंदे गटात जाताच चंद्रशेखर बावनकुळेंनी ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाले, 'अहंकारामुळे पक्ष लयाला गेला'
 जिल्हा

रेल्वेतील मयत मयंक लोहार हत्येतील आरोपीला आधुनिक तंत्रज्ञानामुळे १५ तासांत अटक – गृह राज्यमंत्री योगेश कदम

डिजीटल पुणे    30-06-2026 16:09:30

मुंबई : चर्चगेट-नालासोपारा लोकलमध्ये प्रवासी मयंक लोहार यांच्या हत्येप्रकरणातील आरोपीला अवघ्या १५ तासांत अटक करण्यात आली असून यासाठी सीसीटीव्ही आणि फेशियल रेकग्निशन प्रणालीचा प्रभावी वापर करण्यात आला, अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली. नियम ९७ अन्वये मांडलेल्या स्थगन प्रस्तावावरील निवेदनात त्यांनी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.

चर्चगेट-नालासोपारा लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात २३ जून रोजी रात्री घडलेल्या घटनेबाबत राज्यमंत्री कदम यांनी माहिती दिली. दरवाजा बंद करण्याच्या कारणावरून मयंक लोहार आणि रोशन सुवर्णा यांच्यात वाद झाला. इतर प्रवाशांनी मध्यस्थी करून मयंकला दुसऱ्या दरवाजाजवळ उभे केले. मात्र आरोपीने संतापाच्या भरात बॅगेतील चाकू काढून मयंकच्या पोट व छातीवर वार केले. चाकूचा धाक दाखवून इतर प्रवाशांना मदत करण्यापासून रोखल्यानंतर बोरीवली स्थानकात गाडीचा वेग कमी होताच आरोपी पळून गेला. त्यानंतर गंभीर जखमी मयंकला शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि फेशियल रेकग्निशन प्रणालीच्या मदतीने आरोपीचा माग काढत १५ तासांच्या आत त्याला अटक केली.

मुंबईच्या उपनगरी रेल्वेमधून दररोज ७५ ते ८० लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे प्रत्येक प्रवाशावर प्रत्यक्ष देखरेख करणे शक्य नसल्याचे सांगत राज्यमंत्री कदम यांनी १७७ रेल्वे स्थानकांवर सुमारे ६,९०० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असून २० पोलीस ठाण्यांमधून त्यांचे २४ तास निरीक्षण केले जात असल्याची माहिती दिली. सीसीटीव्हीची संख्या वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्तावही पाठविण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रत्येक प्रवाशाच्या बॅगेची तपासणी करणे व्यवहार्य नसले तरी संशयित व्यक्तींची तपासणी, प्लॅटफॉर्मवरील स्कॅनिंग आणि रेल्वे डब्यांमध्ये अचानक तपासणी केली जाते. या घटनेनंतर सीसीटीव्हीची संख्या वाढविणे आणि रेल्वे परिसरातील गस्त अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोहमार्ग पोलीस आयुक्तालयात ४,१८५ मंजूर पदांपैकी बहुसंख्य पदे भरलेली असून त्याशिवाय २,००० होमगार्ड आणि १५० महाराष्ट्र सुरक्षा बल (एमएसएफ) जवानांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या १,५२० होमगार्ड आणि ११२ एमएसएफ जवान कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली. महिलांच्या सुरक्षेसाठी रात्री ९ ते सकाळी ६ या काळात २१८ लोकल गाड्यांमध्ये विशेष सुरक्षा पथके कार्यरत असून प्रत्येक गाडीत चार सुरक्षा कर्मचारी तैनात केले जात असल्याची माहिती राज्यमंत्री कदम यांनी दिली.

रेल्वे पोलिसांनी सुरू केलेल्या १५१२ हेल्पलाईनवर यावर्षी सुमारे १.५६ लाख कॉल प्राप्त झाले असून ५६ हजार प्रवाशांना सुमारे ४ कोटी ३६ लाख रुपयांचा चोरीचा माल परत मिळवून देण्यात यश आले आहे. तसेच ३०३ गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई आणि मद्यप्राशन व अंमली पदार्थांशी संबंधित ११७ जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहितीही राज्यमंत्री कदम यांनी दिली. अपघात रोखण्यासाठी ‘झिरो डेथ मिशन’ अंतर्गत ६३ अपघातप्रवण ठिकाणे निश्चित करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. तसेच १७७ रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचेही राज्यमंत्री कदम यांनी यावेळी सांगितले.


 Give Feedback



 जाहिराती