नवी दिल्ली : व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली असून हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 183.50 रुपयांची, तर 5 किलोच्या सिलेंडरच्या दरात 13 रुपयांची घट जाहीर केली आहे. हे नवे दर 1 जुलैपासून लागू झाले आहेत.
दरकपातीनंतर राजधानी दिल्लीमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 2,930 रुपये, तर 5 किलोच्या सिलेंडरची किंमत 808.50 रुपये इतकी झाली आहे.गेल्या काही महिन्यांत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती सातत्याने वाढत होत्या. विशेषतः आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि पुरवठ्यातील अडचणींमुळे व्यावसायिक गॅस महागला होता. त्यामुळे हॉटेल आणि खाद्य व्यवसायावर अतिरिक्त आर्थिक भार पडला होता. अशा परिस्थितीत झालेली ही दरकपात व्यावसायिकांसाठी दिलासादायक मानली जात आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल विक्रीवरील काही निर्बंधही हटवले आहेत. यापूर्वी व्यावसायिक ग्राहकांना रिटेल पंपांवरून डिझेल खरेदीसाठी 200 लिटरची मर्यादा घालण्यात आली होती. मात्र, 1 जुलैपासून हा नियम रद्द करण्यात आला असून वाहतूक आणि औद्योगिक क्षेत्राला यामुळेही मोठा दिलासा मिळाला आहे.