सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सचिन अहिर यांची विधानपरिषद उपसभापतीपदी बिनविरोध निवड; फडणवीसांनी सांगितला 'अहिर' शब्दाचा अर्थ, शिंदेंकडून शायरीत शुभेच्छा
  • श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांच्या केंद्रीय मंत्रिपदाची जोरदार चर्चा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच दिल्ली गाठण्याची शक्यता
  • मुंबई-ठाणे-पालघरला दुपारी ४ पर्यंत रेड अलर्ट; पुण्याच्या घाटमाथ्यावरही अतिमुसळधार पावसाचा इशारा
  • मोठी बातमी: व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात, 183 रुपयांची घसघशीत कपात
 DIGITAL PUNE NEWS

'देऊळ बंद 2'चा ऐतिहासिक विक्रम! 100 कोटींचा टप्पा पार करत मराठी बॉक्स ऑफिसवर अव्वल स्थान

डिजिटल पुणे    01-07-2026 13:01:41

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीसाठी 2026 हे वर्ष सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल, असे चित्र सध्या दिसत आहे. वर्षभरात अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली असली, तरी प्रवीण तरडे लिखित-दिग्दर्शित 'देऊळ बंद 2' या चित्रपटाने सर्व विक्रम मोडत नवा इतिहास रचला आहे. या चित्रपटाने 100 कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा पार करत यापूर्वी सर्वाधिक कमाई करणाऱ्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा विक्रम मागे टाकला आहे.

प्रदर्शनानंतर अवघ्या काही आठवड्यांतच 'देऊळ बंद 2'ला महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चित्रपटगृहांमध्ये अनेक ठिकाणी शो हाऊसफुल होत असून परदेशातही या चित्रपटाची लोकप्रियता वाढताना दिसत आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार, भारतातील प्रदर्शनातून चित्रपटाने सुमारे 91.50 कोटी रुपये, तर परदेशातील प्रदर्शनातून 6.55 कोटी रुपये कमावले आहेत. याशिवाय तंबू शोमधून 2.45 कोटी रुपयांची भर पडली असून एकूण कमाईने 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

या ऐतिहासिक यशानंतर दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले. "शंभर कोटींचा टप्पा गाठणे ही आमच्यासाठी मोठी घटना आहे. सर्व रसिक प्रेक्षक आणि स्वामी भक्तांचे मनःपूर्वक आभार," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

21 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 2.89 कोटी रुपयांची कमाई केली होती. पहिल्या आठवड्यातच चित्रपटाने 30.20 कोटी रुपयांचा गल्ला जमवत दमदार सुरुवात केली. त्यानंतर प्रत्येक आठवड्यात चित्रपटाच्या कमाईत सातत्याने वाढ होत गेली.

सध्या प्रदर्शनाच्या सहाव्या आठवड्यातही 'देऊळ बंद 2'ची लोकप्रियता कायम असून महाराष्ट्रासह परदेशातील प्रेक्षकांकडूनही चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या यशामुळे आशयप्रधान आणि भक्तीवर आधारित मराठी चित्रपटही बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करू शकतात, हे 'देऊळ बंद 2'ने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.


 Give Feedback



 जाहिराती