मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा राजकीय धक्का देत शिंदे गटात दाखल झालेले आमदार सचिन अहिर यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी बुधवारी बिनविरोध निवड झाली. महाविकास आघाडीकडून सुरुवातीला ज. मो. अभ्यंकर यांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र सभागृहात सर्वानुमते निर्णय व्हावा, या भूमिकेतून विरोधकांनी उमेदवारी मागे घेतल्याने अहिर यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
सत्ताधारी आघाडीकडून सचिन अहिर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला, तर विरोधी पक्षानेही अखेर या निवडीला पाठिंबा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके यांनी प्रस्ताव मांडला, त्याला विक्रम काळे यांनी अनुमोदन दिले. भाजपकडून प्रवीण दरेकर आणि शिवसेनेकडून मनीषा कायंदे यांनीही प्रस्ताव सादर केला. त्यानंतर सभागृहाने बहुमताने प्रस्ताव मंजूर करत सचिन अहिर यांची विधानपरिषद उपसभापतीपदी निवड जाहीर केली.
निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिन अहिर यांच्या राजकीय प्रवासाचे कौतुक करत 'अहिर' या शब्दाचा अर्थही स्पष्ट केला. "अहिर म्हणजे गोपालक आणि निर्भीड व्यक्ती. १९९९ पासून मी सचिन अहिर यांच्यासोबत काम करत आहे. ते धाडसी आणि स्पष्ट भूमिका घेणारे नेते आहेत," असे फडणवीस म्हणाले.
यावेळी त्यांनी माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या कार्याचाही गौरव केला. तसेच, सचिन अहिर यांनी कामगार चळवळीतून राजकारणात प्रवेश केला, अनेकदा आमदार म्हणून निवडून आले, राज्यमंत्री म्हणून प्रभावी कामगिरी बजावली आणि सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिल्याचे त्यांनी नमूद केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सचिन अहिर यांचे अभिनंदन करत त्यांची तुलना माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्याशी केली. "एक सचिन क्रिकेटच्या मैदानावर इतिहास घडवून निवृत्त झाला, तर दुसरा सचिन आता नव्या भूमिकेत नवी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झाला आहे," असे शिंदे म्हणाले.
यावेळी शिंदे यांनी शेरोशायरीतूनही अहिर यांचे स्वागत केले. "तुफान में जो शांत रहे उसे समुंदर कहते हैं, जो सबके दिल पर राज करते हैं उसे सिकंदर कहते हैं," अशा ओळी म्हणत त्यांनी नव्या उपसभापतींना शुभेच्छा दिल्या.