सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सचिन अहिर यांची विधानपरिषद उपसभापतीपदी बिनविरोध निवड; फडणवीसांनी सांगितला 'अहिर' शब्दाचा अर्थ, शिंदेंकडून शायरीत शुभेच्छा
  • श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांच्या केंद्रीय मंत्रिपदाची जोरदार चर्चा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच दिल्ली गाठण्याची शक्यता
  • मुंबई-ठाणे-पालघरला दुपारी ४ पर्यंत रेड अलर्ट; पुण्याच्या घाटमाथ्यावरही अतिमुसळधार पावसाचा इशारा
  • मोठी बातमी: व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात, 183 रुपयांची घसघशीत कपात
 जिल्हा

विधान परिषद उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमताने झालेली निवड लोकशाही परंपरांचा विजय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डिजिटल पुणे    01-07-2026 18:27:49

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमताने झालेली निवड ही सभागृहाच्या लोकशाही परंपरा आणि संसदीय मूल्यांचा विजय असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.विधान परिषदेत सचिन अहिर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सर्व पक्षांनी सभागृहाच्या उच्च परंपरांचा मान राखत एकमताने ही निवड करण्याचा निर्णय घेतला. यामुळे संसदीय लोकशाही अधिक बळकट झाली असून, सभागृहाच्या सुदृढ परंपरा जपण्याची सामूहिक भावना अधोरेखित झाली आहे. उपसभापतीपदी सचिन अहिर यांची झालेल्या निवडीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन करत, त्यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभव, संतुलित दृष्टिकोन आणि सर्वसमावेशक नेतृत्वाचा सभागृहाच्या कामकाजाला निश्चितच लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सचिन अहिर यांनी विधानसभा सदस्य, राज्यमंत्री आणि विधान परिषद सदस्य म्हणून विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. जनसामान्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील भूमिका, अभ्यासू वृत्ती, निर्भीड कार्यशैली आणि सर्वांशी सुसंवाद राखण्याची क्षमता ही त्यांची जमेची बाजू असून, उपसभापतीपदाची जबाबदारी ते समर्थपणे पार पाडतील. उपसभापती पद हे घटनात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असून, या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीने सर्व सदस्यांना समान न्याय देणे अपेक्षित असते. सचिन अहिर आपल्या संयमी, निष्पक्ष आणि सर्वसमावेशक कार्यपद्धतीमुळे सभागृहाच्या गौरवशाली परंपरांना अधिक बळकटी देतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कार्याचाही गौरव केला. महिलांवरील अत्याचार, दलित, पीडित आणि वंचित घटकांच्या प्रश्नांबाबत त्यांनी घेतलेली संवेदनशील आणि निष्पक्ष भूमिका उपसभापतीपदाची प्रतिष्ठा अधिक उंचावणारी ठरल्याचे त्यांनी नमूद केले. विधान परिषद उपसभापतीपदाची समृद्ध परंपरा अधोरेखित करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, रा. सू.गवई, सूर्यभान वहाडणे आणि वसंतराव डावखरे यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी या पदाची गौरवशाली परंपरा निर्माण केली आहे. सचिन अहिरही ही परंपरा अधिक सक्षमपणे पुढे नेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सचिन अहिर यांच्या सार्वजनिक जीवनाचा आढावा घेताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, १९९३ मध्ये कामगार चळवळीतून त्यांनी सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. १९९९ ते २०१४ या काळात ते सलग तीन वेळा विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले. गृहनिर्माण, सामाजिक न्याय, पर्यावरण, खनिकर्म आणि आदिवासी विकास या विविध विभागाचे राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली. तसेच मुंबईतील सामाजिक, सांस्कृतिक आणि संघटनात्मक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सचिन अहिर विधान परिषद उपसभापती म्हणून  सभागृहाचे कामकाज निष्पक्ष, संयमी आणि सर्वसमावेशक पद्धतीने चालवतील. त्यांच्या कार्यकाळात सभागृहाची गौरवशाली परंपरा अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी  शुभेच्छा दिल्या. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. अशिष शेलार व अन्य सदस्यांनीही मनोगत व्यक्त करुन उपसभापती सचिन अहिर यांचे अभिनंदन केले.


 Give Feedback



 जाहिराती