मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान साकीनाका परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. खैरानी रोडवरील सन्मान हॉटेलजवळ ही दुर्घटना घडली. मोबाईलवर बोलत असताना अस्लम अन्सारी (वय अंदाजे 45) यांना उघड्या मॅनहोलचा अंदाज आला नाही आणि ते थेट त्यात कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनास्थळी खासगी कंत्राटदारामार्फत देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यासाठी मॅनहोलचे झाकण उघडे ठेवण्यात आले होते. मात्र, परिसरात पुरेशा सुरक्षाव्यवस्था किंवा बॅरिकेड्स नसल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने उघडा मॅनहोल लक्षात न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, 108 रुग्णवाहिका आणि महानगरपालिकेच्या पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. सुरुवातीला घटनास्थळी अन्सारी यांची छत्री आणि चप्पल आढळून आली. पाण्याचा वेग प्रचंड असल्याने ते वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. अखेर रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान ते सुमारे 15 ते 20 फूट अंतरावरील दुसऱ्या मॅनहोलमध्ये आढळले. त्यांना बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सदर मॅनहोल सुमारे 20 ते 25 फूट खोल असल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृताच्या भावाने, "काम सुरू असतानाही कोणतेही बॅरिकेड किंवा सुरक्षेची व्यवस्था नव्हती. निष्काळजीपणामुळे माझ्या भावाचा जीव गेला," असा गंभीर आरोप संबंधित यंत्रणांवर केला आहे.या घटनेनंतर पावसाळ्यात सुरू असलेल्या सार्वजनिक कामांदरम्यान सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.