सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम; लोणावळ्यात २४ तासांत ११३ मिमी पावसाची नोंद, जिल्ह्यात पुढील पाच दिवस हलका ते मध्यम पावसाचा अंदाज
 शहर

पुणेकरांची धाकधूक वाढली! खडकवासला धरणात १० वर्षांतील नीचांकी पाणीसाठा; जुलैतील पावसाकडे सर्वांचे लक्ष

डिजिटल पुणे    02-07-2026 18:41:30

पुणे : पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या खडकवासला धरणातील पाणीसाठ्याने यंदा चिंताजनक पातळी गाठली आहे. १ जुलै २०२६ रोजी धरणात केवळ १५.४७ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची नोंद झाली असून, गेल्या दहा वर्षांतील हा सर्वात कमी साठा मानला जात आहे. याच कालावधीत गेल्या वर्षी धरणात ६३.६० टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

यंदा मॉन्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने धरणांमधील पाणीसाठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. खडकवासला धरणावर अवलंबून असलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना आता जुलै महिन्यात समाधानकारक पावसाची अपेक्षा लागून राहिली आहे. पावसाचा जोर कायम राहिला नाही, तर पुढील काळात पाणीटंचाईची शक्यता नाकारता येत नाही.

खडकवासला धरणातील गेल्या दहा वर्षांचा पाणीसाठा पाहता २०१७ आणि २०२६ या दोन्ही वर्षांत १५.४७ टक्के इतकीच नोंद झाली आहे. तर २०२० मध्ये ६२.९२ टक्के आणि २०२५ मध्ये ६३.६० टक्के इतका साठा होता. यंदाचा आकडा सर्वाधिक चिंताजनक मानला जात आहे.

दरम्यान, पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. बुधवारी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला असला तरी त्याचा धरणांवरील पाणीसाठ्यावर फारसा परिणाम झालेला नाही. हवामान विभागाने ७ जुलैपर्यंत पुणे जिल्ह्यात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, पुण्यासह राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पर्यटननगरी लोणावळ्यात गेल्या २४ तासांत ११३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, यंदाच्या हंगामात आतापर्यंत केवळ ५८६ मिमी पाऊस झाला असून, गेल्या वर्षी याच दिवशी हा आकडा २०६१ मिमी इतका होता. त्यामुळे धरणक्षेत्रातही अपेक्षित पाऊस अद्याप झालेला नाही.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील पाच दिवस राज्यभर पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीसह काही भागांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून, येत्या काही दिवसांतील पावसावरच पुण्याच्या धरणांतील पाणीसाठ्याचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती