पुणे : जीविधा संस्थेतर्फे १८ व्या हिरवाई महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘डॉ. हेमा साने स्मृती व्याख्यानमाले’चा दुसरा दिवस गुरुवार, दि.२ जुलै २०२६ रोजी इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र येथे उत्साहात पार पडला. दुसऱ्या दिवशी डॉ. महेश शिंदीकर यांनी ‘आजही साधं राहता येतं…’ या विषयावर व्याख्यान देत डॉ. हेमा साने यांच्या साध्या, पर्यावरणस्नेही आणि मूल्यनिष्ठ जीवनशैलीचा वेध घेतला. आधुनिक जीवनशैलीत वाढत्या उपभोगवादाच्या पार्श्वभूमीवर आजही साधेपणाने, निसर्गाशी सुसंवाद साधत जगणे शक्य आहे, हे डॉ. हेमा साने यांच्या जीवनातून स्पष्ट होते, असे त्यांनी सांगितले.'जीविधा'चे राजीव पंडित आणि सौ. वृंदा पंडित यांनी स्वागत केले.
डॉ. शिंदीकर म्हणाले , 'डॉ. हेमा साने यांनी पर्यावरण संवर्धन ही केवळ अभ्यासाची किंवा चळवळीची बाब न मानता ती आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवली होती. संसाधनांचा मर्यादित वापर, निसर्गाविषयीची कृतज्ञता, स्थानिक जैवविविधतेचे जतन आणि साधेपणातून समृद्ध जीवन जगण्याचा त्यांचा संदेश आजच्या काळात अधिक महत्त्वाचा ठरतो. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी मोठ्या घोषणांपेक्षा जीवनशैलीतील छोटे बदल अधिक प्रभावी ठरतात, असेही त्यांनी नमूद केले.व्याख्यानानंतर उपस्थितांनी डॉ. शिंदीकर यांच्याशी संवाद साधत विविध प्रश्न विचारले. कार्यक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
डॉ. शिंदीकर म्हणाले,' साध्या राहणीमानाबरोबर डॉ. साने यांची विचारसरणी साधी होती. साधे राहणे हे सोपे नाही. शाश्वत विकास संकल्पनेची चर्चा सर्वत्र होत आहे. डॉ. साने आवर्जून त्याबद्दल बोलत असत. साधेपणाकडे वाटचाल केली पाहिजे. विजेची कमी वापर करणे आपल्याला शक्य आहे. नवे जे काही आहे ते सर्व वाईट असे त्या मानत नव्हत्या. नाते निसर्गाशी त्या जगल्या. गरजा कमी करणे म्हणजे साधे राहणे. त्यामुळे उत्कर्ष कमी होईल असे नाही . किमान जागेत कमाल आनंद मिळवणे असेही प्रवाह जगात निर्माण झाले आहेत. संचय करण्यावर विचार केला पाहिजे. आपल्यामुळे इतरांनाही आनंद देता येईल असे पाहिले पाहिजे.
व्याख्यानमालेचा प्रारंभ १ जुलै रोजी डॉ. मंदार दातार यांच्या ‘डॉ. हेमा साने लिहायच्या तेंव्हा…’ या उद्घाटनपर व्याख्यानाने झाला होता. पर्यावरणप्रेमी, विद्यार्थी, संशोधक आणि नागरिकांनी दोन्ही दिवस उत्स्फूर्त प्रतिसाद देत व्याख्यानांचा लाभ घेतला.
व्याख्यानमालेचा समारोप शुक्रवार, दि. ३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार असून डॉ. राहुल देशपांडे ‘जाऊ देवाचिया गावा…’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. हे व्याख्यान इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, सचिन तेंडुलकर जॉगिंग पार्कसमोर, राजेंद्रनगर, म्हात्रे पुलाजवळ, पुणे येथे होणार असून पर्यावरणप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जीविधाचे राजीव पंडित आणि सौ. वृंदा पंडित यांनी केले आहे.