सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला नवे वळण; सिया-चेतनने मित्रालाही सांगितला होता कट, बीडमधील तरुण पोलिसांच्या ताब्यात
  • स्टिंग एनर्जी ड्रिंकवर विधानसभेत जोरदार चर्चा; शाळांजवळ विक्रीवर बंदीचे निर्देश, तुकाराम मुंढेंची विधानभवनात उपस्थिती
  • महाराष्ट्रात दूध व्यवसायासाठी नवे नियम लागू; उल्लंघन करणाऱ्यांवर दंड आणि कठोर कारवाई होणार, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय
  • राम मंदिर लुटारूंना अब हिंदू माफ नहीं करेगा; 5 जुलैला दादरमध्ये 'रामरक्षा' आंदोलन, उद्धव ठाकरेंनी भाजपविरोधात रणशिंग फुंकलं!
 शहर

पुण्यात मुसळधार पावसाचा तडाखा; सिंहगडाच्या पायरी मार्गावर दरड कोसळली, पर्यटकांना सतर्कतेचा इशारा

डिजिटल पुणे    03-07-2026 12:10:35

पुणे : पुणे शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता ऐतिहासिक पर्यटनस्थळांवरही दिसून येत आहे. शुक्रवारी सकाळी किल्ले सिंहगडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील पायरी मार्गावर अचानक दरड कोसळल्याची घटना घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी प्रशासनाने पर्यटकांना विशेष सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दरड कोसळल्यानंतर तीन ते चार मोठे दगड थेट पायऱ्यांवर येऊन पडले. वनसंरक्षण समितीच्या सुरक्षारक्षकांनी सकाळच्या पाहणीदरम्यान हा प्रकार निदर्शनास आणला. त्यानंतर घटनास्थळाची पाहणी करून संबंधित यंत्रणेला माहिती देण्यात आली. वनसंरक्षण समितीचे अध्यक्ष पांडुरंग सुपेकर यांनी या घटनेला दुजोरा दिला असून, दरड नेमकी कोणत्या वेळी कोसळली याबाबत अद्याप स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले.

यापूर्वीही चार दिवसांपूर्वी सिंहगड घाट रस्त्यावर किरकोळ दरड कोसळल्याने काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता. मात्र, प्रशासनाने तातडीने जेसीबीच्या साहाय्याने माती आणि दगड हटवून रस्ता पुन्हा सुरू केला होता.

सध्या सिंहगड परिसरात मुसळधार पाऊस, दाट धुके आणि निसरडा पायरी मार्ग यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे गडावर येणाऱ्या पर्यटकांनी अनावश्यक गर्दी टाळावी, सुरक्षिततेचे नियम पाळावेत आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पावसाळ्यात सिंहगडावर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असते. मात्र, सध्याची हवामान परिस्थिती लक्षात घेता पुढील काही दिवस गडावर भेट देताना विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, पायरी मार्गावरील पडलेले दगड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, परिस्थितीवर संबंधित यंत्रणा सतत लक्ष ठेवून आहे.

 

 


 Give Feedback



 जाहिराती