सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला नवे वळण; सिया-चेतनने मित्रालाही सांगितला होता कट, बीडमधील तरुण पोलिसांच्या ताब्यात
  • स्टिंग एनर्जी ड्रिंकवर विधानसभेत जोरदार चर्चा; शाळांजवळ विक्रीवर बंदीचे निर्देश, तुकाराम मुंढेंची विधानभवनात उपस्थिती
  • महाराष्ट्रात दूध व्यवसायासाठी नवे नियम लागू; उल्लंघन करणाऱ्यांवर दंड आणि कठोर कारवाई होणार, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय
  • राम मंदिर लुटारूंना अब हिंदू माफ नहीं करेगा; 5 जुलैला दादरमध्ये 'रामरक्षा' आंदोलन, उद्धव ठाकरेंनी भाजपविरोधात रणशिंग फुंकलं!
 शहर

मुरलीधर मोहोळ यांचा मोठा निर्णय; पौड फाटा-वनदेवीपर्यंत मेट्रोसह दुमजली उड्डाणपूल, विमानतळ मेट्रो मार्गालाही अंतिम मंजुरी

डिजीटल पुणे    03-07-2026 12:41:11

पुणे : केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत पुण्याच्या वाहतूक आणि मेट्रो प्रकल्पांबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. डेक्कन ते वारजे मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पौड फाटा ते वनदेवी मंदिरापर्यंत मेट्रोसह दुमजली (डबल डेकर) उड्डाणपूल उभारण्याचे निर्देश मोहोळ यांनी मेट्रो प्रशासनाला दिले. याच बैठकीत कल्याणीनगर ते पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ या नव्या मेट्रो मार्गालाही अंतिम मंजुरी देण्यात आली.

पुणे मेट्रो भवन येथे झालेल्या बैठकीत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डीकर, पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ, विनोदकुमार अग्रवाल, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वनाज ते चांदणी चौक या विस्तारित मेट्रो मार्गावरील पौड रस्त्यावरील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन कचरा डेपोपासून थेट दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. तसेच, कर्वे रस्त्यावर पौड फाट्यापासून वनदेवी मंदिरापर्यंत मेट्रोसह दुहेरी उड्डाणपूल उभारण्याच्या सुधारित आराखड्याचे (डीपीआर) काम तातडीने सुरू करण्याचे आदेश मोहोळ यांनी दिले. या प्रकल्पामुळे डेक्कन, कर्वेनगर, कोथरूड आणि वारजे परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असून, या मार्गावरील पाच महत्त्वाचे चौक सिग्नलमुक्त होणार आहेत.

बैठकीत पीसीएमसी-भक्ती शक्ती चौक, रामवाडी-वाघोली, खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला, नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग तसेच हडपसर-लोणी काळभोर या प्रस्तावित मेट्रो मार्गांचाही आढावा घेण्यात आला. या सर्व मार्गांच्या विस्तारित प्रकल्प अहवालाची तयारी गतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

याशिवाय, शहरातील शेवटच्या टप्प्यातील (लास्ट माईल) प्रवासासाठी पीएमपीएमएलशी समन्वय साधून प्रभावी नियोजन करण्याचे निर्देशही देण्यात आले. तसेच, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ३६ किलोमीटर लांबीच्या आणि २४ मीटर रुंदीच्या एचसीएमटीआर वर्तुळाकार रस्त्याच्या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आदेशही मोहोळ यांनी महापालिका प्रशासनाला दिले.

बैठकीदरम्यान निधी आणि तांत्रिक अडचणींचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, "निधीची चिंता करू नका. पुणेकरांच्या हिताला प्राधान्य देत सुधारित आराखडा तयार करा. आवश्यक मंजुरी आणि निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी आहे." त्यांच्या या भूमिकेमुळे पुण्यातील मेट्रो आणि वाहतूक प्रकल्पांना वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 


 Give Feedback



 जाहिराती