मुंबई : बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान लवकरच तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत आमिरने स्वतः माध्यमांसमोर 5 जुलै रोजी गौरी स्प्रॅटसोबत लग्न करणार असल्याची माहिती दिली. हा विवाह अत्यंत साध्या आणि कौटुंबिक वातावरणात पार पडणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले.
'प्रेम पेड्रो'च्या प्रीमियरदरम्यान आमिर खान आपल्या मोठ्या मुलगा जुनैद खानसोबत उपस्थित होता. यावेळी माध्यमांनी त्याला लग्नाबाबत प्रश्न विचारताच तो हसत-लाजत म्हणाला, "हो, मी 5 जुलैला लग्न करतोय." त्याच्या या उत्तरानंतर शेजारी उभ्या असलेल्या जुनैदलाही हसू आवरले नाही. बाप-लेकाचा हा क्षण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
आमिरने सांगितले की, लग्नाचा सोहळा अत्यंत छोटेखानी असेल. कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र यांच्या उपस्थितीत घरीच विवाह पार पडणार आहे. कोणताही भव्यदिव्य सोहळा न करता साधेपणाने लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले. तसेच नव्या आयुष्यासाठी चाहत्यांनी शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यावेत, अशी विनंतीही त्याने केली.
आमिर खानचे हे तिसरे लग्न असणार आहे. यापूर्वी त्याने रीना दत्ता यांच्याशी विवाह केला होता. त्यांना जुनैद आणि इरा ही दोन मुले आहेत. त्यानंतर 2005 मध्ये त्याने किरण राव यांच्याशी लग्न केले. या दोघांना आझाद राव खान हा मुलगा असून 2021 मध्ये त्यांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मात्र आजही दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध कायम आहेत.
आता दोन विवाहांनंतर आमिर खान गौरी स्प्रॅटसोबत नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी सज्ज झाला आहे. 5 जुलै रोजी होणाऱ्या या कौटुंबिक विवाहसोहळ्याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले असून सोशल मीडियावर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.