मुंबई : राज्यातील शाळांच्या परिसरात स्टिंग एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर बंदी घालण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. विधानसभेतील चर्चेनंतर शाळांच्या ५०० मीटर परिसरात स्टिंग एनर्जी ड्रिंकची विक्री रोखण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिले.
पावसाळी अधिवेशनादरम्यान श्रीगोंदा-नगर मतदारसंघाचे भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी स्टिंग एनर्जी ड्रिंकमुळे मुलांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा मुद्दा उपस्थित केला. या पेयाच्या बाटलीवरच लहान मुले आणि गर्भवती महिलांसाठी ते योग्य नसल्याचा उल्लेख असूनही शाळांजवळ त्याची खुलेआम विक्री होत असल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. मुलांमध्ये या पेयाचे वाढते आकर्षण चिंताजनक असल्याचे सांगत त्यांनी यावर कठोर निर्बंधांची मागणी केली.
यावर उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवळ यांनी शाळांच्या ५०० मीटर परिसरात स्टिंग एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर बंदी घालण्याचे निर्देश देण्यात येतील, असे स्पष्ट केले. तसेच शाळांच्या परिसरात अंमली पदार्थांसह अशा पेयांच्या विक्रीवरही नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
विधानभवनात तुकाराम मुंढेंची उपस्थिती
स्टिंग एनर्जी ड्रिंकच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे विधानभवनात उपस्थित होते. राज्यभरात गुटखा, पानमसाला तसेच अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात सुरू असलेल्या कारवाईचा आढावा यावेळी घेण्यात आला.
तपासणी सुरू असल्याची झिरवळांची माहिती
भाजप आमदार राहुल कुल यांनी शाळांच्या परिसरात विविध एनर्जी ड्रिंक्स, फ्लेव्हर पानाच्या नावाखाली होणारी अंमली पदार्थांची विक्री तसेच फ्लेव्हर मिल्कमध्ये होणाऱ्या भेसळीची चौकशी करण्याची मागणी केली. त्यावर उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवळ यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली संबंधित प्रकरणांची तपासणी सुरू असल्याची माहिती सभागृहात दिली.
मुंबईतील नामांकित हॉटेल्स आणि बेकरींवर कारवाई
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाने मुंबईतील अनेक नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बेकरी आणि क्लबवर अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान चुकीचे ब्रँडिंग, अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन आढळून आल्याने संबंधित आस्थापनांच्या अन्न सुरक्षा परवान्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ही मोहीम आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार सुरू असून राज्यभरात अशाच प्रकारच्या तपासण्या आणि कारवाया सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
२५ मे रोजी स्वीकारला होता पदभार
अन्न व औषध प्रशासन विभागात आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी २५ मे रोजी पदभार स्वीकारला. विभागातील पारदर्शकता वाढवणे, अन्न सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि भ्रष्टाचारावर आळा घालणे यासाठी त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे.