वाई : सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता घाटरस्त्यांवरही दिसून येत आहे. शुक्रवार (3 जुलै) रोजी वाई-पाचगणी मार्गावरील पसरणी घाटात दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सध्या या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू असून प्रशासनाकडून दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
दरड कोसळल्यानंतर पाचगणी- महाबळेश्वरकडे जाणाऱ्या वाहनचालकांना अत्यंत सावधगिरीने प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आवश्यक असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्लाही प्रशासनाने दिला आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पसरणी घाट हा वाई, पाचगणी आणि महाबळेश्वर या महत्त्वाच्या पर्यटनस्थळांना जोडणारा प्रमुख मार्ग आहे. पावसाळ्यात येथील निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना आकर्षित करत असले, तरी सततचा पाऊस, दाट धुके आणि दरडी कोसळण्याचा धोका यामुळे प्रवास अधिक धोकादायक ठरत आहे. घाटातील नागमोडी वळणे आणि अरुंद रस्ता यामुळे वाहनचालकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.
दरम्यान, शनिवार-रविवार आणि सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर या मार्गावर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ वाढते. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असून, प्रतिकूल हवामानामुळे अडचणी वाढू शकतात. यामुळे घाट परिसरात अनावश्यक थांबणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून वेण्णा लेक परिसरातही जोरदार सरी कोसळत आहेत. दाट धुके आणि कमी झालेली दृश्यमानता यामुळे वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.