सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला नवे वळण; सिया-चेतनने मित्रालाही सांगितला होता कट, बीडमधील तरुण पोलिसांच्या ताब्यात
  • स्टिंग एनर्जी ड्रिंकवर विधानसभेत जोरदार चर्चा; शाळांजवळ विक्रीवर बंदीचे निर्देश, तुकाराम मुंढेंची विधानभवनात उपस्थिती
  • महाराष्ट्रात दूध व्यवसायासाठी नवे नियम लागू; उल्लंघन करणाऱ्यांवर दंड आणि कठोर कारवाई होणार, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय
  • राम मंदिर लुटारूंना अब हिंदू माफ नहीं करेगा; 5 जुलैला दादरमध्ये 'रामरक्षा' आंदोलन, उद्धव ठाकरेंनी भाजपविरोधात रणशिंग फुंकलं!
 जिल्हा

मुसळधार पावसामुळे उरण व द्रोणागिरी रेल्वे स्टेशन जलमय; रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात नागरिकांचा तीव्र संताप

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    03-07-2026 18:13:33

उरण : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून उरण तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र, उरण व द्रोणागिरी रेल्वे स्टेशन परिसरात साचलेल्या पाण्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या बेजबाबदारपणा, निष्काळजीपणा आणि ढिसाळ नियोजनाचे पुन्हा एकदा दर्शन घडल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

स्टेशन परिसरातील जिने, पायऱ्या आणि प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही प्रभावी व्यवस्था नसल्याने रेल्वे प्रशासनाचा कारभार केवळ कागदोपत्री असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

उरण परिसरात रेड अलर्ट असतानाही स्टेशन परिसरात पाणी साचण्याची समस्या कायम राहिल्याने प्रशासनाच्या दाव्यांची पोलखोल झाली आहे. प्रत्येक पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होत असताना कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात रेल्वे प्रशासनाला अपयश आले असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेशी सर्रास खेळ केला जात असल्याचा संताप व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, हजारो प्रवासी दररोज या मार्गावरून प्रवास करत असताना त्यांच्या जीविताची कोणतीही पर्वा नसल्याचे चित्र दिसत आहे. महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना पाण्यातून मार्ग काढत रेल्वेत चढावे लागत असून, एखादा अपघात घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

स्थानिक नागरिकांनी रेल्वे प्रशासनाला तातडीने जागे होण्याचे आवाहन करत स्टेशन परिसरातील पाणी निचऱ्याची सक्षम व्यवस्था करावी, दोषी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी आणि भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.


 Give Feedback



 जाहिराती