पुणे : प्रेमविवाह करून संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या २५ वर्षीय विवाहितेने कथित मानसिक छळाला कंटाळून पुण्यातील राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी मृत महिलेच्या पतीला अटक केली असून, त्याच्यासह एका तरुणीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत महिलेचे नाव वृषाली भीमराव आरडे ऊर्फ वृषाली रोहित घोडे (वय २५) असे आहे. याप्रकरणी तिची आई लक्ष्मी आरडे (रा. इंदापूर) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आरोपींमध्ये रोहित मच्छिंद्र घोडे आणि त्याची कथित प्रेयसी तृप्ती वाकचौरे यांचा समावेश आहे.
बारामतीहून पुण्यात संसार, पण नात्यात आला दुरावा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृषाली आणि रोहित यांनी सप्टेंबर २०२१ मध्ये प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर काही काळ बारामती येथे वास्तव्यास असलेले हे दाम्पत्य रोजगाराच्या निमित्ताने पुण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून ते उरुळी देवाची येथील वैष्णव सिटी परिसरात भाड्याच्या घरात राहत होते. रोहित हा डी-मार्टमध्ये नोकरी करत होता.
विवाहबाह्य संबंधांमुळे वाढला वाद
नोकरीदरम्यान रोहितचे त्याच ठिकाणी काम करणाऱ्या तृप्ती वाकचौरे हिच्याशी कथित प्रेमसंबंध जुळल्याचे समोर आले. या संबंधांची माहिती वृषालीला मिळाल्यानंतर पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होऊ लागले. सततचा मानसिक आणि कथित शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर २७ जून रोजी वृषालीने राहत्या घरी आत्महत्या केली. घटनेनंतर फुरसुंगी पोलिसांनी तपास सुरू केला.
मोबाईलमधील 'Keep Notes' ॲपमध्ये सापडली चिठ्ठी
तपासादरम्यान वृषालीच्या मोबाईलमधील 'Keep Notes' ॲपमध्ये लिहिलेली एक डिजिटल चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली. फिर्यादीनुसार, या चिठ्ठीत तिने आपल्या मृत्यूस पती रोहित घोडे आणि त्याचे तृप्ती वाकचौरे हिच्यासोबत असलेले संबंध कारणीभूत असल्याचा उल्लेख केला आहे. तसेच दोघांकडून मानसिक व शारीरिक त्रास होत असल्याचाही दावा करण्यात आला आहे.या प्राथमिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी रोहित घोडे याला अटक केली असून, तृप्ती वाकचौरे हिच्याविरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास फुरसुंगी पोलीस करत आहेत.